Tejasvee Ghosalkar reply Uddhav Thackeray, मुंबई : "मी तेजस्वीच्या विरोधात नाही, पण तिला ज्यांनी फोडलंय त्या भाजप विरोधात आहे. त्या भाजपचा पराभव करण्यासाठी मी इथे आलोय. तुम्हाला भाजपचा पराभव करावा लागेल. मला आज अभिषेकची सुद्धा आठवण येत आहे. कारण अभिषेक असता तर आज भाजपची हिंमत झाली नसती", असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहिसरमधील जनतेला मशालीला मतदानासाठी आवाहन केलं होतं. विशेष म्हणजेच काही दिवसांपूर्वी साथ सोडून गेलेल्या भाजप उमेदवार तेजस्वी घोसळकर यांच्या वार्डात त्यांनी संयत भाषण केलं होतं. दरम्यान, आता भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर जोरदार टीका केलीये. त्या 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
ADVERTISEMENT
तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, मी आणि अभिषेकने दोघांनी मिळून प्रत्येक निर्णय घेतले होते. अभिषेक असता तर जे काही असेल ते दोघांनी मिळूनच केलं असतं. मला असं वाटतं की, अजूनही अभिषेक माझ्याबरोबरच आहेत. उद्धव ठाकरे अभिषेकचं नाव घेऊन उगाचच प्रचार करत आहेत. निष्ठावंत अन् हे... ते चुकीचं आहे. उगाचच अभिषेकच नाव तुम्ही कशाला घेताय. माझा नवरा आहे, मी काहीही करु शकते. माझा नवरा आहे तर मी त्यांचा फोटो वापरणारच ना? मी का वापरायचे नाहीत? हे चुकीचे स्टेटमेंट आहे, मला पटलेलं नाही.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
दहिसरमधील वार्डात भाषण करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, इथे धनश्री एका निष्ठेने उभी आहे. घरफोड्या वृत्तीचा पराभव करावा लागेल. भावाला भावाविरुद्ध उभं करायचं. हिंदू-मुस्लिम करायंच. मराठी-अमराठी करायचं ही, यांची वृत्ती आहे. या वृत्तीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लढू शकतो. मराठी माणूस लढू शकतो. मी आणि 'राज'ने आज वचननामा जाहीर केला. कोस्टर रोड आपण केला, कॉलेज आणि शाळा आपण सुरु केल्या. हॉस्पिटलची सुधारणा आपण केली. बेस्ट बसेस सुरु केल्या, याचं श्रेय निर्लज्जपणे भाजप घेत आहेत. दुसऱ्याच्या काम करण्याची चोरी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
शिवसेना प्रमुखांचा पुतळा आपण उभारला. त्याचं होर्डिंग देखील शिंदेंनी छापलंय. सगळी यंत्रणा हातात घेऊन विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला लावत आहेत. ही झुंडशाही आहे. पैशाच्या बळावर कोणालाही विकत घेऊ शकतो. ही मस्ती या वार्डात तुमच्याकडून उतरवून पाहिजे. मी परत एकदा सांगतो, मी तेजस्वीच्या विरोधात नाही, पण तिला ज्यांनी फोडलंय त्या भाजप विरोधात आहे. त्या भाजपचा पराभव करण्यासाठी मी इथे आलोय. तुम्हाला भाजपचा पराभव करावा लागेल, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











