BJP meeting at Devendra Fadnavis bungalow : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर, मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या कोट्यातील जागांसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्याबाबतही मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
भाजप कोअर कमिटीची खलबतं
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या बैठकीला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, मंत्री पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह कोअर कमिटीचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या 7 जागांपैकी भाजपच्या वाट्याला त्यांच्या संख्याबळानुसार 4 जागा येण्याची शक्यता आहे. या चार जागांसाठी कोणाला संधी द्यायची, यावर बैठकीत दीर्घकाळ खल झाला.
हेही वाचा : सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याहींवर भाजपने टाकली मोठी जबाबदारी, कोणतं पद दिलं?
रामदास आठवलेंबाबत मोठा निर्णय?
या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उमेदवारीचा ठरलाय. गेल्या अनेक दिवसांपासून आठवले यांना पुन्हा संधी मिळणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या कोट्यातील एका जागेवर रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. मित्रपक्षाला सोबत घेण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून आठवलेंना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे समजते.
तीन नावांची जोरदार चर्चा
आठवलेंची जागा निश्चित मानली जात असली तरी, उर्वरित तीन जागांसाठी भाजपने अनुभवी आणि निष्ठावान चेहऱ्यांवर भर दिल्याचे दिसत आहे. सध्या या तीन नावांची सर्वाधिक चर्चा आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय असलेल्या विनोद तावडे यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवून त्यांचे पुनर्वसन केले जाण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत.
अंतिम निर्णय दिल्लीश्वरांच्या हाती
भाजपची ही कार्यपद्धती पाहता, शेवटच्या क्षणी एखादे 'सरप्राईज' नाव समोर आले तरी नवल वाटायला नको. मात्र, तूर्तास तावडे, रहाटकर आणि पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. अर्ज भरण्यासाठी आता अवघ्या सहा दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने, पुढील काही दिवसांत भाजप आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. या निवडीतून भाजप आगामी विधानसभा निवडणुकीचे समीकरण कसे साधते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











