Thane Politics : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी मंगळवारी (दि.30) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी सर्वच राजकीय पक्षांमधील उमेदवारांची मोठी धावपळ झालेली पाहायला मिळाली. उमेदवारी अर्ज भरताना झालेली धावपळ आणि तणावामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची प्रकृती खालावली अन् त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आलीये.
ADVERTISEMENT
मीरा रोडमधील नया नगर परिसरात राहणारे ६६ वर्षीय जावेद पठाण हे मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 22 मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे निवडणूक रिंगणात उतरणार होते. मंगळवार हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने ते सकाळी हैदरी चौक येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर केल्यानंतर कार्यालयाबाहेर पडताच त्यांची प्रकृती अचानक खालावली. उपस्थितांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. निवडणुकीच्या धावपळीत एका उमेदवाराचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराने व्हिलचेअरवर येत भरला अर्ज
दुसरीकडे ठाण्यातील मुंब्रा-शैलशनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उमेदवार संगीता दवणे यांनी अपघातासारख्या परिस्थितीतही आपल्या निर्धाराचा प्रत्यय दिला. सोमवारी सकाळी घरात स्वयंपाक करत असताना कुकरचा अचानक स्फोट झाला. या घटनेत त्या गंभीररीत्या भाजल्या गेल्या. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मात्र मंगळवार हा अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्याने, प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार न घेण्याचा निर्णय घेतला. रुग्णवाहिकेतून थेट मुंब्रा प्रभाग समितीच्या कार्यालयात पोहोचत, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तिसरी घटना ठाण्याच्या नौपाडा परिसरातील आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेल्या सुनेश जोशी यांना रात्री उशिरा तिकीट देण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही, जोशी यांनी निवडणूक प्रक्रियेकडे पाठ फिरवली नाही. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
BMC Election 2026: 'तिलाच सारखं... ', शिवसैनिक 'फायर आजी' उद्धव ठाकरेंवर एवढी का संतापली?
ADVERTISEMENT











