‘तुम्ही मला कधीच परकं मानलं नाही…’, ‘ती’ घोषणा करत अजिंक्य रहाणेला रडूच कोसळलं!

मुंबई तक

30 Jul 2026 (अपडेटेड: 30 Jul 2026, 12:08 PM)

अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये संघाला ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवून देणाऱ्या या 38 वर्षीय खेळाडूने सोशल मीडियावर एक भावनिक संदेश शेअर केला आहे.

Ajinkya Rahane Retirement

Ajinkya Rahane Retirement

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'आता इथेच विराम...'

point

अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

point

सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Ajinkya Rahane Retirement : 2020-21 ची ती मालिका... जिथे कागदावरचा विजय ऑस्ट्रेलियाचा आधीच नक्की मानला जात होता. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांचे भवितव्य धूसर दिसत होते. अडचण एवढीच नव्हती, तर संघातले दिग्गज खेळाडू दुखापत आणि वैयक्तिक कारणांमुळे एकापाठोपाठ एक मैदानातून गायब होत होते. अशातच, अडलेलं जहाज बुडणार की वाचणार, याचं उत्तर शोधण्यासाठी एक शांत, संयमी चेहरा पुढे आला तो म्हणजे अजिंक्य रहाणे.

हे वाचलं का?

विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर, राहिला तो फक्त नवख्या, अननुभवी पोरांचा एक ताफा आणि त्यांच्यासमोर कांगारूंचा अजिंक्य मानला जाणारा गढ, गाबा! ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक भेदक चेंडूवर भारतीय खेळाडूंचे रक्त-घााम सांडत होते. सामना तासागणिक बदलत होता, आणि विजयाची पारडी दोन्ही बाजूला झुकत होती. संपूर्ण क्रिकेट जगताचा श्वास रोखला गेला होता. अखेर, ऑस्ट्रेलियाचा तो पोलादी मारा आणि चिवट फलंदाजांचे मनसुबे धुळीला मिळाले.

रहाणेच्या त्या शांत पण तितक्याच घातक रणनीतीने ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीत असा काही सळो की पळो करून सोडला, की ऑस्ट्रेलियाचा तो भक्कम किल्ला ढासळला. ज्या मालिकेचा शेवट भारताच्या पराभवाने होईल असं मानलं जात होतं, तिथेच भारताने 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं! भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून देणारा अजिंक्य रहाणे आज क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त होत आहे.

गुरुवारी, 30 जुलै रोजी अजिंक्यने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या उत्कृष्ट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चे नेतृत्व करणाऱ्या रहाणेने स्पष्ट केले आहे की, तो आता आयपीएलसह कोणत्याही स्वरूपातील क्रिकेट खेळणार नाही. निवृत्तीची घोषणा करताना 38 वर्षीय अजिंक्य रहाणेने लिहिले, "कॅप नंबर 287, आता इथेच विराम. इतक्या वर्षांत मिळालेल्या अफाट प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. मी तुमचा नेहमीच ऋणी राहीन." या संदेशाद्वारे त्याने आपले चाहते, सहकारी खेळाडू, प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेटशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचे आभार मानले.

कर्णधार म्हणून विक्रम

अजिंक्य रहाणे हा भारताच्या त्या मोजक्या कर्णधारांपैकी एक आहे ज्यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे कर्णधार म्हणून त्याचा विक्रम अतिशय प्रभावी राहिला आहे. त्याने 6 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, ज्यामध्ये संघाने 4 सामने जिंकले तर 2 सामने अनिर्णित (ड्रॉ) राहिले; म्हणजेच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकही कसोटी सामना गमावला नाही. एकदिवसीय (ODI) प्रकारात त्याने 3 सामन्यांत नेतृत्व करत तिन्ही सामने जिंकले, तर 2 टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 1 विजय आणि 1 पराभव नोंदवला.

हे ही वाचा : लेक 40 दिवसांनी आला, मिठी मारत रडले, धमक्या, भीती सांगितली, अभिजीतलाही रडू आलं

'असं' आहे रहाणेचं रेकॉर्ड

अजिंक्य रहाणेने भारतासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने तिन्ही प्रकारांत मिळून 35.95 च्या सरासरीने एकूण 8,414 धावा केल्या, ज्यामध्ये 15 शतके आणि 51 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 38.46 च्या सरासरीने 5,077 धावा (12 शतके, 26 अर्धशतके), एकदिवसीय क्रिकेटमध्ये 35.26 च्या सरासरीने 2,962 धावा (3 शतके, 24 अर्धशतके) आणि टी-20 मध्ये 375 धावा (1 अर्धशतक) केल्या आहेत. याशिवाय, आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना त्याने 212 सामन्यांमध्ये 30.15 च्या सरासरीने 5,367 धावा केल्या, ज्यामध्ये 2 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.

हे ही वाचा : 'भाजप कार्यकर्त्यांची कॉमेडी नाही...' सुप्रिया सुळे का भडकल्या?

ऑस्ट्रेलियातील अविस्मरणीय मालिका विजय

रहाणेच्या क्रिकेट कारकिर्दीतील सुवर्णक्षण 2020-21 च्या ऐतिहासिक ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाहायला मिळाला. अ‍ॅडलेड कसोटीतील नामुष्कीजनक पराभवानंतर आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने भारतीय संघाची कमान सांभाळली. मेलबर्न कसोटीत त्याने ठोकलेल्या शानदार शतकामुळे भारताने मालिकेत जोरदार पुनरागमन केले. त्यानंतर युवा खेळाडूंच्या बळावर भारतीय संघाने गाबा (ब्रिस्बेन) येथील ऐतिहासिक मैदानात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत 2-1 असे पराभूत केले. भारतीय क्रिकेट इतिहासातील ही सर्वांत अविस्मरणीय मालिका मानली जाते आणि या विजयाचा शिल्पकार म्हणून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे नाव नेहमीच आदराने घेतले जाईल.