भारताचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jusprit Bumrah Batting) भारतीय क्रिकेट संघाची सूत्रे हाती घेताच विश्वविक्रम केला आहे. बुमराहने हा विक्रम बॉलींगने नव्हे तर बॅटने केला. त्याने एका षटकात सर्वाधिक धावा घेत वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला आहे.
ADVERTISEMENT
भारत-इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात खेळल्या जात असलेल्या एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बुमराहने अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचा धुव्वा उडवला आणि त्याच्या एका षटकात 35 धावा काढत विश्वविक्रम केला आहे. अशा प्रकारे त्याने लाराचा 18 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. लाराने 2004 मध्ये एका षटकात 28 धावांचा विश्वविक्रम केला होता, ज्याची त्यानंतर दोनदा पुनरावृत्ती झाली.
शनिवारी, 2 जुलै रोजी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे अर्धा तास आधी थांबवावे लागले, मात्र तोपर्यंत संपूर्ण सत्र भारताच्या नावावर राहिले. यामध्ये टीम इंडियाचा पहिला डाव 412 धावांवर संपुष्टात आला. तसेच इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात धक्का बसला आहे. या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता भारतीय संघाचा नवा कर्णधार जसप्रीत बुमराह ज्याने आधी आपल्या बॅटने दहशत निर्माण केली आणि नंतर बॉलनेही तेच केले, जे तो गेली अनेक वर्षे सातत्याने करत आहे.
बुमराहने कपिल आणि युवराजची आठवण करून दिली
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात रवींद्र जडेजाच्या शानदार शतकाने झाली आणि त्यानंतर जसप्रीत बुमराहने झझांवती खेळी केली. महान अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार कपिल देव यांच्यानंतर पहिल्यांदाच एका वेगवान गोलंदाजाने कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारली आहे. बुमराहने पहिल्याच डावात कपिल देव यांच्या प्रमाणेच तुफानी फलंदाजी केली. यादरम्यान त्याने एकूण 4 चौकार आणि 2 षटकार मारले. ब्रॉडची अशी अवस्था होती की त्याने षटकात एक नो बॉल आणि एक वाईड बॉलही टाकला, ज्यामध्ये 4 धावा अतिरिक्त होत्या. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली.
ADVERTISEMENT
