टी-२० मालिका खिशात घातल्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेलाही चांगली सुरुवात केली आहे. कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेरीस भारताने ४ विकेट गमावत २५८ धावांपर्यंत मजल मारली आहे. सलामीवीर शुबमन गिलचं फॉर्मात परतणं आणि मुंबईकर श्रेयस अय्यरचं कसोटी पदार्पणातलं झुंजार अर्धशतक हे पहिल्या दिवसाच्या खेळाचं वैशिष्ट्य ठरलं आहे.
ADVERTISEMENT
नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कॅप्टन अजिंक्य रहाणेने पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या मयांक अग्रवाल आणि शुबमन गिल जोडीने भारताला सावध सुरुवात करुन दिली. काएल जेमिन्सनच्या बॉलिंगवर मयांक अग्रवाल १३ रन्स काढून फसला आणि भारताला पहिला धक्का बसला. यानंतर मैदानात आलेल्या चेतेश्वर पुजाराने गिलला उत्तम साथ दिली.
चेतेश्वर पुजाराने एक बाजू लावून धरत आणि गिलने दुसऱ्या बाजूने काही सुरेख फटकेबाजी करत भारताचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मामुळे चर्चेत असलेल्या गिलनेही यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण केलं. परंतू यानंतर लगेचच जेमिन्सनने त्याला क्लिन बोल्ड केलं. गिलने ९३ बॉलमध्ये ५ फोर आणि १ सिक्स लगावत ५२ धावा केल्या. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजाराच्या साथीने संघाचा डाव सावरला.
परंतू टीम साऊदीने पुजाराचा बचाव भेदत त्याला २६ धावांवर आऊट केलं. अजिंक्य रहाणे दरम्यानच्या काळात मैदानावर चांगला स्थिरावला होता. श्रेयस अय्यरच्या साथीने त्यानेही महत्वाची भागीदारी करुन भारताची बाजू वरचढ ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतू जेमिन्सनच्या बॉलिंगवर बॅटची कड घेऊन येणारा चेंडू थेट स्टम्पवर आदळला आणि भारताला चौथा धक्का बसला. ६ चौकारांसह रहाणेने ३५ धावा केल्या.
४ बाद १४५ अशा विचीत्र अवस्थेत अडकलेल्या टीम इंडियाला पुन्हा एकदा एका भागीदारीने तारलं. आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने आपल्या खडूस वृत्तीला जागत न्यूझीलंडच्या बॉलर्सचा नेटाने सामना केला. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यर आणि रविंद्र जाडेजाने या काळात आपलं अर्धशतक पूर्ण करत न्यूझीलंड बॉलर्सच्या नाकीनऊ आणले. दिवसाअखेरीस श्रेयस अय्यर ७५ तर रविंद्र जाडेजा ५० धावांवर नाबाद होता. न्यूझीलंडकडून जेमिन्सनने ३ तर साऊदीने १ विकेट घेतली.
ADVERTISEMENT











