Shoaib Akhter On India Womens Team WC Final 2025 : आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव (Ind W vs SA W) करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिलांनी पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या या अविस्मरणीय कामगिरीचं जगभरातून कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि माजी कर्णधार रमीझ राजाने भारतीय संघाच्या या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
शोएब अख्तर काय म्हणाला ?
माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला, “भारताचं मनापासून अभिनंदन! भारतीय मुलींनी अप्रतिम खेळ केला आणि त्या निश्चितच या विजयासाठी पात्र होत्या. त्यांनी देशाला आनंद साजरा करण्याची संधी दिली. टीम इंडियाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही उच्च दर्जाची होती. पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरलेला भारतीय संघ व्यापक विजय मिळवण्यात यशस्वी ठरला, याचा मला अत्यंत आनंद आहे,” असं अख्तरने सांगितलं.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा म्हणाला, “भारताने पुन्हा सिद्ध केलं की तो जगातील सर्वात मजबूत संघांपैकी एक का आहे. भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत उत्कृष्ट कामगिरी केली,” अशी प्रतिक्रिया रमीझ राजाने आपल्या व्हिडिओमध्ये दिली.
हेही वाचा : विश्वचषक जिंकला, आता स्मृती मंदानाच्या लग्नाचा बार उडणार, सांगलीत पार पडणार विवाह सोहळा
अंतिम सामन्याचा आढावा घेतला तर, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 7 बाद 298 धावा उभारल्या. शेफाली वर्मा 78 चेंडूत 87 धावा करत सर्वाधिक धावसंख्या नोंदवणारी ठरली. तिच्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. शेफालीने स्मृती मानधनासोबत (45 धावा) 104 धावांची दमदार सलामी भागीदारी केली. दीप्ती शर्माने 58 चेंडूत 58, रिचा घोषने 24 चेंडूत 34, तर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौरने अनुक्रमे 24 आणि 20 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. कर्णधार लॉरा वोल्वार्डने 98 चेंडूत 101 धावा करून शतक झळकावलं. तिच्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार होता. अॅनेरी डिर्कसेनने 35, सन लुसने 25, आणि तंजीम ब्रिट्सने 23 धावा केल्या. मात्र अखेरीस आफ्रिकन संघ 52 धावांनी पराभूत झाला.
भारताकडून दीप्ती शर्माने विलक्षण गोलंदाजी करत सामन्याचं पारडं फिरवलं. तिने 9.3 षटकांत 39 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. शेफाली वर्माने 2 आणि श्री चरणीने 1 बळी घेतला. या विजयाने भारतीय महिला क्रिकेटचा नवा सुवर्ण अध्याय लिहिला गेला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघासाठी बीसीसीआयने पेटारा उघडला, किती रुपये मिळणार?
ADVERTISEMENT











