पैसा-पाणी : AI चा फुगा फुटणार? हुआंग यांच्या राजीनाम्याने काय होणार?
Nvidia कंपनीच्या chips वरील AI उद्योगाचे अवलंबित्व आणि कंपनीच्या ग्राहकांमधील गुंतवणुकीमुळे आर्थिक संकटाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे AI क्षेत्रातील तेजीचा फुगा फुटणार का? जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पैसा-पाणी : AI चा फुगा फुटणार?
हुआंग यांच्या राजीनाम्याने काय होणार?
पैसा पाणी : Nvidia या कंपनीत गेल्या आठवडाभरात मोठ्या घडामोडी घडल्या. गेल्या रविवारी कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेन्सन हुआंग यांनी आपल्या प्रेमसंबंधांची कबुली दिली. एकापाठोपाठ तीन महिलांसोबत त्यांचे संबंध असल्याची माहिती समोर आली. यापैकी एलिस हुआंग नावाची एक महिला कथितपणे चीनची गुप्तहेर असल्याचेही सांगितले जात आहे.
मात्र, हे प्रकरण केवळ प्रेमसंबंधांपुरते मर्यादित नाही. Nvidia च्या chips ची तस्करी करून त्या चीनमध्ये पोहोचवल्या जात असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. chip म्हणजे AI चे मेंदूच आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात चीनने आघाडी घेऊ नये, यासाठी अमेरिकेने चीनला chips पुरवण्यावर निर्बंध घातले आहेत. या सगळ्या घडामोडींचा परिणाम म्हणून आठवडा संपण्यापूर्वीच हुआंग यांनी राजीनामा दिला. Nvidia समोरील संकटामुळे संपूर्ण AI उद्योगच अडचणीत येणार का? जाणून घेऊयात..
Nvidia ही कंपनी AI उद्योगासाठी इतकी महत्त्वाची का आहे?
जवळपास 33 वर्षांपूर्वी जेन्सन हुआंग यांनी Nvidia कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला ही कंपनी GPU (Graphics Processing Unit) म्हणजेच ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट चिप्स तयार करत होती. या chips CPU (Central Processing Unit) म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट चिप्सपेक्षा वेगळ्या होत्या. GPU चा वापर प्रामुख्याने ग्राफिक्स आणि व्हिडीओ गेम्ससाठी केला जात होता. त्यावेळी CPU तयार करणाऱ्या इंटेलसारख्या कंपन्यांच्या तुलनेत Nvidia खूप मागे होती. मात्र, AI मुळे कंपनीचे नशीबच बदलले. AI मॉडेलला प्रशिक्षण देण्यासाठी GPU हे CPU पेक्षा अधिक वेगवान मानले जाऊ लागले. त्यामुळे Nvidia चे महत्त्व झपाट्याने वाढले. आज AI च्या जगात Nvidia चे जवळपास एकाधिकारशाहीसारखे स्थान निर्माण झाले आहे. कंपनीच्या chips मोठी मागणी आहे; मात्र त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. एकेकाळी शेअर बाजारात Nvidia ही जगातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी बनली होती. जेन्सन हुआंग यांच्याकडेही AI उद्योगाचा प्रमुख चेहरा म्हणून पाहिले जाऊ लागले.
हुआंग यांनी राजीनामा दिला म्हणून Nvidia चे कामकाज थांबेल, असे नाही. मात्र, कंपनीच्या चिप्सच्या पुरवठ्यात थोडाही चढ-उतार झाला, तरी संपूर्ण AI उद्योगावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही जेव्हा ChatGPT किंवा इतर कोणत्याही चॅटबॉटशी संवाद साधता, तेव्हा तुम्हाला उत्तर देण्यामागे याच चिप्सची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे या chips पुरवठा विस्कळीत झाला, तर AI क्षेत्रातील अनेक सेवांवर परिणाम होऊ शकतो.
यामध्ये आणखी एक महत्त्वाचा पेच आहे. Nvidia ने स्वतःच्या ग्राहक कंपन्यांमध्येच मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले आहेत. ज्या कंपन्यांमध्ये Nvidia ने गुंतवणूक केली आहे, त्याच कंपन्यांना ही कंपनी आपल्या chips विक्रीही करते. काही प्रकरणांमध्ये तर Nvidia या कंपन्यांच्या सेवांची ग्राहकदेखील आहे. या आर्थिक व्यवहारांच्या पद्धतीला 'सर्क्युलर फायनान्सिंग' (Circular Financing) असे म्हटले जाते. ही बाब बाजारासाठी आधीपासूनच चिंतेचा विषय ठरली आहे. Nvidia आपल्या ग्राहक कंपन्यांना पैसे देते, जेणेकरून आपल्या चिप्सची मागणी कायम राहील. मात्र, आर्थिक व्यवहारांची ही साखळी कुठेही तुटली, तर AI क्षेत्रात निर्माण झालेला तेजीचा फुगा फुटू शकतो.
