किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या इमारतीत किती बांगलादेशी आढळले? पाहाच

अँटॉप हिलमधील स्वप्नपूर्ती इमारतीत 50 हून अधिक बांगलादेशी राहत असल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप. स्थानिक रहिवाशांनी आरोप फेटाळले; पोलिसांकडे तक्रार दाखल.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या इमारतीत किती बांगलादेशी आढळले? पाहाच

point

पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई केलीय? याबद्दल मोठी माहिती समोर

मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील स्वप्नपूर्ती इमारतीचा विषय सध्या चर्चेत आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या इमारतीत बांगलादेशी नागरिक राहत असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर स्थानिक रहिवाशांनी आपली बाजू मांडली असून, सोमय्या यांनी दिलेल्या यादीतील नागरिकांच्या नावांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या इमारतीत 50 पेक्षा अधिक बांगलादेशी नागरिक राहत असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्ष इमारतीत जाऊन रहिवाशांशी संवाद साधल्यानंतर वेगळीच माहिती समोर आली आहे. अनेक रहिवाशांनी आपण जन्मापासून मुंबईत राहत असल्याचे सांगितले. काहींनी आपली कुटुंबे अनेक वर्षांपासून याच परिसरात राहत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बांगलादेशी घुसखोर असल्याच्या आरोपावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : पुढील काही तास महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यांत मध्यरात्री गारवा जाणवणार

महाराष्ट्रातील नागरिकांनाही बांगलादेशी ठरवण्यात आल्याचा आक्षेप

स्वप्नपूर्ती इमारतीतील रहिवासी इक्बाल शेख यांनी या आरोपांवर नाराजी व्यक्त केली. आपण स्वतःच्या फ्लॅटमध्ये कुटुंबासह राहत असून, यापूर्वी 25 वर्षे सरकारी सेवेत काम केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते महाराष्ट्रातील विविध मंत्र्यांसोबत काम करत होते. तसेच त्यांचा मुलगा भारतीय सैन्यात असून, जम्मू-काश्मीरमध्ये त्याने सेवा बजावली आहे. 2022 मध्ये ते निवृत्त झाले. आपली मातृभाषा मराठी असून, आपल्याला बांगलादेशी म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांनी आरोप करण्याऐवजी संबंधित नागरिक बांगलादेशी असल्याचे पुराव्यांसह सिद्ध करावे, अशी मागणीही त्यांनी केली. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सोमय्या यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या यादीतील अनेक आडनावे महाराष्ट्रातील आहेत. व्यापारी, पावसकर, पाटील, लांबे आणि लोखंडे यांसारखी आडनावे असलेल्या नागरिकांनाही बांगलादेशी ठरवण्यात आल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. संबंधित नागरिकांकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असल्याचा दावाही करण्यात आला.

हेही वाचा : सोलापूर : लोखंडी पाईपमध्ये चाकू अडकवून तरुणावर सपासप वार, भरदिवसा मोबाईल शॉपीत काय घडलं?

काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थानिक प्रतिनिधींनी किरीट सोमय्या यांचे आरोप फेटाळले

या प्रकरणावर स्थानिक लोकप्रतिनिधींनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थानिक प्रतिनिधींनी किरीट सोमय्या यांचे आरोप फेटाळले आहेत. संबंधित इमारतीत आपले नातेवाईक बेकायदेशीरपणे राहत असल्याचा आरोपही त्यांनी चुकीचा असल्याचे म्हटले. असा एकही नातेवाईक इमारतीत राहत असल्याचे सिद्ध झाल्यास आपण राजीनामा देऊ, असे आव्हानही त्यांनी दिले. तसेच किरीट सोमय्या आणि सोसायटीच्या सचिवांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. या प्रकरणात अँटॉप हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 356 अंतर्गत बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय, रहिवाशांची नावे आणि फ्लॅट क्रमांक असलेली यादी सार्वजनिक केल्याबद्दलही आक्षेप घेण्यात आला आहे. ही वैयक्तिक माहिती असून ती सार्वजनिक करणे चुकीचे असल्याचे स्थानिक प्रतिनिधींनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून तपास आणि पडताळणीची मागणी करण्यात आली आहे.

इमारतीतील इतर रहिवाशांनीही आपली बाजू मांडली. काही नागरिकांनी आपण जन्मापासून मुंबईत राहत असल्याचे सांगितले, तर काहींनी गेल्या अनेक वर्षांपासून अँटॉप हिल आणि वडाळा परिसरात वास्तव्यास असल्याचे स्पष्ट केले. एका रहिवाशाने आपण तीन वर्षांपासून स्वप्नपूर्ती इमारतीत भाड्याने राहत असल्याचे सांगितले. तर एका महिलेने आपल्या लग्नाला 16 ते 17 वर्षे झाली असून, तेव्हापासून आपण याच परिसरात राहत असल्याचे सांगितले. तिच्या कुटुंबाने म्हाडाकडे आवश्यक कागदपत्रे सादर केल्याचा दावाही केला. या आरोपांमुळे स्थानिक नागरिकांना मानसिक त्रास होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. दुसरीकडे, या प्रकरणात कायदेशीर मार्गाने लढा देण्याची भूमिका स्थानिक प्रतिनिधींनी घेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाचे योग्य प्रतिनिधित्व करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनंतर स्वप्नपूर्ती इमारतीत नेमके किती बांगलादेशी नागरिक आढळले, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. पोलिसांच्या पडताळणीनंतरच या आरोपांमधील सत्य स्पष्ट होऊ शकणार आहे.