महाराष्ट्र काँग्रेसकडून हकालपट्टी! आशिष देशमुखांना संतापले, नाना पटोलेंवर प्रहार
महाराष्ट्र काँग्रेस शिस्तपालन समितीकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आशिष देशमुख यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील ओबीसी नेते असा उल्लेख करत देशमुखांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर प्रहार केला आहे.
ADVERTISEMENT

माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. महाराष्ट्र काँग्रेस शिस्तपालन समितीकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आशिष देशमुख यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील ओबीसी नेते असा उल्लेख करत देशमुखांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर प्रहार केला आहे. राहुल गांधींनी ओबीसींची माफी मागितली असती, तर त्यांना राजीव गांधींकडून झालेली चूक दुरूस्त करता आली असती, असंही देशमुखांनी म्हटलं आहे.
काँग्रेसकडून करण्यात आलेल्या कारवाईवर आशिष देशमुख म्हणाले, “निष्कासनाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. ही कारवाई म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व चुकीच्या लोकांकडे असल्याचे द्योतक आहे. ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उचलल्याबद्दल मला काँग्रेस नेत्यांनी पक्षातून काढले. मला त्यांनी कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यावर मी सविस्तर उत्तर दिले होते. महाराष्ट्रासह देशभरातील माध्यमांनी माझे उत्तर सविस्तर प्रसिद्ध केले. त्यात काही तथ्य होते म्हणूनच त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली. मात्र, माझे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना समाधानकारक वाटत नाही, एवढेच कारण त्यांनी निष्कासनासाठी दाखविले आहे. याचा अर्थ मला पक्षातून काढण्याचे आधीच ठरले होते आणि नोटीसनंतर दिली गेली, असाही काढता येतो.”
हेही वाचा >> Bacchu Kadu यांचं मंत्रिपद गेलं? शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
आशिष देशमुख यांनी त्यांच्या निवेदनात कोणत्याही नेत्याचा उल्लेख केला नसला, तरी त्यांचा रोख नाना पटोले यांच्याकडेच असल्याचं दिसत आहे. ते म्हणतात “काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. काँग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या लोकशाहीसाठी, एकात्मतेसाठी बलिदान दिले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते मात्र स्वातंत्र्य, लोकशाही असे काहीही मानत नाहीत. त्यांना जो आवडत नाही, त्याला ते दूर करतात. मी ओबीसींच्या प्रश्नांवर आवाज उचलत असल्यामुळे स्वतःला ओबीसी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेत्यांची अडचण होत होती. आशिष देशमुखांचे पक्षातील वजन वाढले, तर आपले वजन कमी होईल, असे या दुकानदार नेत्यांना वाटत होते.”
पुढे त्यांनी असंही म्हटलं आहे की, “माझा गुन्हा कोणता, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी सूचना मी केली. काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष असेल तर ही सूचना लोकतांत्रिक आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचा पक्ष लोकशाहीवादी नसल्याचे सिद्ध करण्याची घाई झालेली दिसते.”