Jack Dorsey: “ट्विटर बंद करू, छापे टाकू”, माजी सीईओचे मोदी सरकारवर गंभीर आरोप
भारतात शेतकरी आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी मोदी सरकारकडून दबाव टाकण्यात आला होता, असा आरोप ट्विटरचा माजी सीईओ जॅक डोर्सीने केला आहे.
ADVERTISEMENT

Jack Dorsey News : ट्विटरचा सह-संस्थापक जॅक डोर्सी याने केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. जॅक डॉर्सीने थेट मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. एका मुलाखतीत डोर्सीने दावा केला आहे की, त्यांच्या कंपनीला (ट्विटर) भारतातून अशा मागण्या केल्या होत्या, ज्यात शेतकरी आंदोलन कव्हर करणारी खाती ब्लॉक करण्यात यावीत. यासोबतच आंदोलनाला समर्थन देणारे आणि सरकारला विरोध करणारी खातीही बंद करण्याची मागणी करण्यात आली होती.
यूट्यूब चॅनल ब्रेकिंग पॉइंट्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान जॅक डोर्सी याने सांगितले की, “त्यांच्याकडे भारतातून अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. डोर्सीच्या मुलाखतीतील हा भाग ट्विटरवर ट्विट केली गेली आहे. मुलाखतीदरम्यान, जेव्हा जॅक डोर्सीला असा प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्हाला गेल्या काही वर्षांत परदेशातील सरकारांकडून दबाव टाकला गेला का?
“ट्विटर कार्यालये बंद करण्याची दिली होती धमकी”
प्रश्नाला उत्तर देताना जॅक डोर्सी म्हणाला की, “उदाहरणच द्यायचे झाले, तर भारताचे घेऊ. भारतीय अधिकाऱ्यांकडून शेतकरी आंदोलनाच्या बातम्या दिल्या जाणाऱ्या आणि जी खाती सरकारला अडचणीची ठरत आहेत, ती बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. भारतीय अधिकाऱ्यांनी विनंती मान्य न केल्यास भारतातील ट्विटरची कार्यालये बंद करू अशी धमकी दिली होती. हे एक प्रकारे अशा पद्धतीने सांगितले गेले की, आम्ही कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकू आणि ते त्यांनी केलंही. खाती बंद केली गेली नाही, तर कार्यालये बंद करू, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला होता,” असा गंभीर आरोप जॅक डोर्सीने मोदी सरकारवर केला आहे.
केंद्रीय मंत्र्यांचे जॅक डॉर्सीला उत्तर…
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, “डोर्सीचे दावे चुकीचे आहेत. डोर्सीच्या कार्यकाळात ट्विटर आणि त्यांची टीम सातत्याने भारतीय कायद्यांचे उल्लंघन करत आहे. 2020 ते 2022 पर्यंत अनेक वेळा नियम तोडले गेले.”