कार्तिकी एकादशी : 'आम्ही मंदिरात कुरघोडीची कामं करत नाही'; फडणवीसांनी केली महापूजा

औरंगाबाद जिल्ह्यातील साळुंखे दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यासोबत महापूजेचा मान
official puja of vitthal rukmini in pandharpur by deputy chief minister devendra fadnavis
official puja of vitthal rukmini in pandharpur by deputy chief minister devendra fadnavis

कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुखमाईची शासकीय महापूजा शुक्रवारी पहाटे पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान औरंगाबाद जिल्ह्यातील साळुंखे दाम्पत्याला मिळाला.

भुवैकुंठ असलेलं पंढरपूर कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेलं. कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली.

मागील ५० वर्षांपासून वारी करणारे माधवराव साळुंखे (वय ५८ ) आणि कलावती माधवराव साळुंखे (वय, ५५ रा. शिरोडी खुर्द, फुलंब्री, जि. औरंगाबाद ) या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांबरोबर पूजा करण्याचा मान मिळाला.

शुक्रवारी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सपत्नीक श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन झालं. त्यानंतर प्रथम विठूरायाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. नंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक महापूजा पार पडली.

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा महापूजेनंतर माध्यमांशी संवाद

विठ्ठल रुखमाईची महापूजा पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मला अतिशय समाधान आहे की, आज विठू माऊलीची, पांढुरंगाची पूजा करण्याची संधी मिळाली. हा अतिशय भाग्याचा असा योग आहे. ही पूजा होते ती मनाला शांती देणारी पूजा आहे. पांढुरंगाला नेहमी आमचं एक साकडं असतं कारण हा सामान्य माणसाचा देव आहे. कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा त्यामुळे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत. त्यांचंही जीवन सुजलाम सुफलाम व्हावं. यासाठी कार्य करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना आम्ही पांढुरंगाकडे करत असतो."

राज्याबाहेर चाललेले उद्योग परत यावेत, त्याबद्दल विठू माऊलीला काय सांगितलं? असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काही ठिकाणं सोडून द्यायला पाहिजे. अशा ज्या चर्चा आहेत ना, या चर्चांत अशी ठिकाणं सोडून दिली पाहिजे. मंदिर आहे हे. मंदिरात आम्ही कुरघोडीची कामं करत नाहीत", असं फडणवीस म्हणाले.

'पांढुरंगाचीच कृपा आहे की...', देवेंद्र फडणवीस महापूजेनंतर काय म्हणाले?

"ही पांढुरंगाचीच कृपा आहे की, आषाढीचीही पूजा करायला मिळाली आणि कार्तिकीचीही पूजा करायला मिळाली. मला वाटतं हा त्यांचा आशीर्वादच आहे", असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in