आदित्य ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा, खास फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

आदित्य ठाकरे यांनी खास शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंबाबत एक महत्त्वाचा संदेश लिहिला आहे
aaditya thackeray birthday wishes to uddhav thackeray special photo social media
aaditya thackeray birthday wishes to uddhav thackeray special photo social mediaफोटो सौजन्य-आदित्य ठाकरे, इंस्टाग्राम पेज

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसंच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने शिवसेनेचे नेते आणि आमदार तसंच उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा दिल्या आहेत. इंस्टाग्रामवर आदित्य ठाकरेंनी त्यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट करत या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हटलंय आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना?

मी माझ्या वडिलांना आणि माझ्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मला माझे वडील रोज मी प्रामाणिकपणे आणि दयाळूपणे करत असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन देतात. माझ्या हातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी प्रेरित करत असतात. या आशयाचं वाक्य आदित्य ठाकरे यांनी लिहिलं आहे.

उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्ष प्रमुख असा केलेला नाही त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र दीपक केसरकर यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे दीपक केसरकर यांनी?

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होतेच. पक्ष प्रमुख असण्यापेक्षा मुख्यमंत्रीपद हे मोठं असतं त्यामुळे अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा कुठलाही चुकीचा अर्थ माध्यमांनी काढू नये असं आवाहन दीपक केसरकर यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे.

२१ जूनला महाराष्ट्रात जे बंड झालं त्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी २९ जूनला विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आत्तापर्यंत झालेलं शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड म्हणून या बंडाकडे पाहिलं जातं आहे. दुसरीकडे आम्हीच खरी शिवसेना आहोत आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. तसंच एकनाथ शिंदे हे भाजपचा पाठिंबा घेत मुख्यमंत्री झाले आहेत.

या सगळ्या बंडामुळे शिवसेना हा पक्ष फुटला आहे. अशात ही फूट आणखी होऊ नये आणि पक्षाची नव्याने बांधणी करावी यासाठी आदित्य ठाकरे हे कसोशीनं प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी नुकतीच शिवसंवाद यात्राही काढली होती. या यात्रेचा पहिला टप्पा नुकताच संपला आहे. १ ऑगस्टपासून पुन्हा एकदा आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा काढतील. या सगळ्या दरम्यान चांगला प्रतिसाद आदित्य ठाकरेंना मिळतो आहे. अशात आदित्य ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दिवशी खास फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छा चर्चेत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in