
केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत. वाशिममध्ये आयोजित मोर्चावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलक तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक तरुण जखमी झाले आहेत.
लष्करात भरती होऊ इच्छिणारे तरुण या योजने विरोधात संताप व्यक्त करत आहेत. वाशिममध्ये ही या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, व इतर सामाजिक राजकीय संघटनांनी महाअक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते.
अकोलामध्येही राष्ट्रवादीचे आंदोलन
अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी काँग्रेसने अकोल्यात निषेध नोंदवला आहे. अकोला-जम्मू तावी नांदेड हमसफर एक्स्प्रेसला थांबवून रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने पोलीस विभागात खळबळ उडाली, रेल्वे रोको केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मध्य रेल्वेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत 8 मिनिटे रेल्वे थांबवली. प्रशासनाच्यावतीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, मात्र अन्य अज्ञात ठिकाणी गाडी थांबवल्यानंतर पोलिसांची पळापळ झाली.
अग्निपथ योजने विरोधात डोंबिवलीत राष्ट्रवादी रस्त्यावर..
अग्निपथ योजनेविरोधात (Agneepath Scheme) आंदोलनाचे पडसाद राज्यभर पडताना दिसत आहेत. या योजनेविरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलने निदर्शने सुरू आहे. तसेच या योजनेचा निषेध करण्यासाठी आता राष्ट्रवादी देखील रस्त्यावर उतरली आहे. आज राष्ट्रवादीचे कल्याण -डोंबिवली युवक जिल्हाध्यक्ष राज जोशी यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीत अग्निपथ योजना आणि केंद्र सरकारच्या विरोधात एकत्र येत निदर्शने केली आहेत.
ठाण्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको
आज ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यकर्त्यांनी पूर्व द्रुतगती महामार्गावर येऊन रास्ता रोको केला व या रास्ता रोकोमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. या रास्ता रोकोमुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर जवळपास 10 ते 15 मिनिटे वाहतूक कोंडी झालेली या ठिकाणी पाहायला मिळाली.
आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळातच स्थानिक पोलीस या ठिकाणी येऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. केंद्र सरकारने केलेला या योजने विरोधात हे आंदोलन असून केंद्र सरकारने गरीब मुलांचा जर विचार केला नाही तर येत्या काळात मोठ्या प्रमाणात भव्य आंदोलन केंद्र सरकार विरोधात छेडले जाईल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी दिलेला आहे.