गोळीबार केल्याच्या आरोपावर सदा सरवणकर यांचा खुलासा; शिवसेनेवरच केला आरोप

शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यावर आमदार सरवणकर यांनी खुलासा केला आहे.
गोळीबार केल्याच्या आरोपावर सदा सरवणकर यांचा खुलासा; शिवसेनेवरच केला आरोप

मुंबई पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्यावर आर्म्स अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी त्यांची भूमिका मांडली. गोळीबाराच्या आरोपावरही सरवणकर यांनी खुलासा केला.

सदा सरवणकर पत्रकार परिषदेत म्हणाले, "विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांचं स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. गेली अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. एका बाजूला मनसेचा स्वागत कक्ष होता. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एका शिवसेनेचं होतं. मी फार उशिरा तिथे गेलो. पण, तिथे सुरुवातीपासून हावभाव करणं वगैरे असं सुरू होतं. हे दुर्दैवी आहे", असं मत सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.

"सणासुदीला एकमेकांना डिवचण्याचे प्रकार व्हायला नको होते. ज्यावेळी मी तिथे गेलो. मी त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. साधारणतः ११ वाजता पोलिसांनी आम्हाला विनंती केली की हे बंद करा. त्यानंतर मी आमच्यासोबत असलेल्या सगळ्यांना घेऊन निघून आलो", असा खुलासा सदा सरवणकर यांनी केला आहे.

"काल रात्री आमचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने महेश सावंत, शैलेश माळी, चंदन साळुंखे, विनायक देवरुखकर गेले. त्यांनी हल्ला केल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यावेळी मी तिथे गेलो आणि त्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात गेलो. खरंतर हे सगळे एकाच कुटुंबातील मुलं आहेत, त्यांनी अशा प्रकारे वाद करणं उचित नाही. ते दुर्दैवानं झालं", असं सदा सरवणकर म्हणाले.

"गणपती विसर्जनाच्या दिवशी एकमेकांना डिवचण्याचा प्रकार झाला. त्यानंतर तो वाद तिथे संपायला हवा होता, मात्र ३० ते ४० लोकांनी त्यांच्या घरी जाऊन हल्ला करणं योग्य नाही. हे टाळायला पाहिजे होतं", असंही आमदार सरवणकर यांनी म्हटलं आहे.

गोळीबार केल्याच्या आरोपावर आमदार सदा सरवणकर काय म्हणाले?

पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. या आरोपावर बोलताना सदा सरवणकर म्हणाले, "मी या भागाचा आमदार आहे. मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करत आहे. त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी रणनीती आखली जातेय. त्याचाच हा एक भाग आहे. मी कामाने मोठा झालेलो आमदार आहे. मी भांडणं करून मोठा झालेलो नाही. माझ्या मतदारसंघातील गल्लीबोळात काम दिसतील. त्यांच्याकडे (शिवसेना) दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी काही नाही. त्यामुळे मला थांबवण्यासाठी हे आरोप केले जात आहेत", अशी भूमिका सदा सरवणकर यांनी गोळीबाराच्या आरोपावर मांडली.

"परवाना असलेलं पिस्तुल माझ्याकडे आहे, पण माझ्याबरोबर स्टेनगन असलेली पोलीस फौज असताना मला त्याची काय गरज आहे", असं सदा सरवणकर म्हणाले. पिस्तुल हातात असलेला एक व्हिडीओ सदा सरवणकर यांचा व्हायरल झाला आहे. त्यावर आमदार सरवणकर म्हणाले, "मला ते खरं वाटत नाही. सोशल मीडिया माझ्यासाठी अज्ञानाचा एक भाग आहे", असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in