दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात 'शिमगा'; राज ठाकरेंच्या मनसेनंही घेतली उडी

shiv sena dasara melava 2022 : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आलेला असतानाच आता मनसेही मेळाव्या घेण्याची शक्यता आहे.
shiv sena dasara melava 2022 : uddhav thackeray, eknath shinde, Raj Thackeray
shiv sena dasara melava 2022 : uddhav thackeray, eknath shinde, Raj Thackeray

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, आता दसरा मेळाव्यावरून शिवसेना, शिंदे गट आणि मनसेमध्ये शिमगा होण्याची चिन्ह दिसताहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होईल, असं शिवसेनेकडून ठामपणे सांगितलं जातंय. दुसरीकडे शिंदे गटही मेळाव्या घेण्याची शक्यता असून, आता यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) उडी घेतलीये.

'वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो', या राज ठाकरेंनी अलिकडेच केलेल्या विधानाचा उल्लेख करत मनसेचे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी ट्विट केलं. संदीप देशपांडे यांच्या याच ट्विटमुळे शिवसेना-शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या संघर्षात मनसेही उडी मारणार ही चर्चा सुरू झालीये.

शिवसेना दसरा मेळावा 2022 : संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट केलं. त्यात संदीप देशपांडे म्हणतात, "शिवतीर्थवर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटणं!आजच्याघडीला दोन्ही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे, पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे 'वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो."

राज ठाकरेंना मनसे पदाधिकारी करणार विनंती

बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, हिंदुत्वाचा विचार, मराठी माणसाचा विचार पुढे गेला पाहिजे. यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक राज ठाकरे यांना विनंती करणार आहोत की, दसऱ्याच्या दिवशी देशातील आणि महाराष्ट्रातील जनता त्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहे. तर त्यांनी दसऱ्याच्या दिवशी संबोधित करावं, असंही संदीप देशपांडे म्हणाले.

shiv sena dasara melava 2022 : uddhav thackeray, eknath shinde, Raj Thackeray
दसरा मेळावा शिवसेनेचा म्हणजे आमचाच होणार, उद्धव ठाकरे यांची गर्जना

शिंदे गटाच्या भूमिकेकडे लक्ष

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होत असतो. कोरोना काळात तो होऊ शकला नाही. दरम्यान, यंदा शिवसेनेत फूट पडून शिंदे गट निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेत असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला शिंदे गटाकडून मेळाव्यातून उत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याबद्दल अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. दसरा मेळाव्याबद्दल एकनाथ शिंदे ठरवतील असं शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे दसरा मेळावा अजून लांब असून, नंतर भूमिका स्पष्ट करू असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. त्यामुळे यंदाच्या दसऱ्याला मेळाव्यावरून शिमगा होण्याची शक्यता दिसत आहे.

शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार -उद्धव ठाकरे

दरम्यान, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासंदर्भात शिवसेनेकडून महापालिका प्रशासनाला पत्र देण्यात आली आहेत. मात्र, यावरील निर्णय अजून बीएमसी प्रशासनाने घेतलेला नाही. गणेशोत्सवानंतर निर्णय घेतला जाईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दुसरीकडे महापालिकेकडून परवानगी मिळाली नसली, तरी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार आणि मुंबईत शिवसेने व्यतिरिक्त आणखी कोण दसरा मेळावा घेणार, या प्रश्नांची उत्तर येत्या ५ ऑक्टोबरला मिळणार आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in