शिक्षक परिषदेला तिकीट... फडणवीसांनी भाजपा शिक्षक आघाडीचे टोचले कान

Nagpur MLC Election 2023 : नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी भाजप शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना प्रचारात उतरण्याच्या सूचना केल्या.
Nagpur MLC election 2023 Devendra fadnavis speech
Nagpur MLC election 2023 Devendra fadnavis speech

नागपूर शिक्षक मतदारसंघातून शिक्षक परिषदेचे नागो गाणार हे भाजपचे उमेदवार आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपा शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले.

रेशीमबाग येथील महर्षि व्यास सभागृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 'भाजपा शिक्षक आघाडीनं चांगलं काम केलं आहे, पण आता शिक्षक परिषदेला तिकीट आहे म्हणून घरी बसू नका. नागो गाणारांना निवडून आणणंही तुमची जबाबदारी आहे. केलेल्या उत्तम कामाची पावती या निवडणुकीत मिळवून घ्यायची आहे. त्यामुळे शिक्षक आघाडीनं सहाही जिल्ह्यांत सक्रिय होऊन काम केले पाहिजे', असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं.

'सगळ्यांनी मनात आणलं तर एक चांगला विजय मिळेल. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक निव्वळ प्रचारानं कुणी निवडून येत नाही. मेळाव्यानंही लढता येत नाही. घरोघरी जाऊन निवडणूक लढवावी लागते. प्रत्येक मतदाराच्या पाठीमागे एक माणूस हवा. वैयक्तिक संपर्कातूनही निवडणूक लढता येते. खालपर्यत यंत्रणा नेऊन, प्रत्येक शिक्षकासोबत पोहचून निवडणूक लढली पाहिजे', अशा सूचना फडणवीसांनी केल्या.

'काही शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका अशा झाल्या की, त्या पाहून लाज वाटते. त्या निवडणुकांमध्ये पैशापासून सर्व गोष्टींचा वापर झाला. पण, गाणारांच्या दोन्ही निवडणुकांमध्ये पारदर्शीपणाने निवडून आलो. निवडणूक अंगावर घेऊन लढायची आहे. भाजपा आणि मित्रपक्षाची सर्व यंत्रणा कामाला लागली पाहिजे. वर्षानुवर्ष ही जागा शिक्षक परिषद लढते आणि भाजपा व मित्रपक्ष त्यांना समर्थन देते. याहीवेळी आपण पूर्ण समर्थन दिलेले आहे', अशी भूमिका फडणवीसांनी मेळाव्यात मांडली.

'नागो गाणार आमदार नसताना जसे होते तसेच आजही आहेत. बारा वर्ष आमदार राहिल्यानंतरही त्यांच्यामध्ये तसुभरही फरक झालेला नाही. अनेकवेळा वर्ष दोन वर्षातच काही आमदारांची विमाने आकाशात उडताना दिसतात. पण बारा वर्षांनंतरही गाणारांचे पाय जमिनीवर आहेत. या बारा वर्षात एकही डाग लागलेला नाही. भ्रष्टाचार, अनाचार व दुराचाराचा, दुर्व्यवहाराचा आरोप कोणीही त्यांच्यावर करू शकत नाही', असं म्हणत फडणवीसांनी गाणारांचं कौतुक केलं.

काही आमदारांना बिल्डरांच्या प्रश्नांमध्ये जास्त इंटरेस्ट -फडणवीस

'काही शिक्षक आमदारांना शिक्षकांच्या प्रश्नांव्यतिरिक्त बिल्डरांच्या प्रश्नांमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. मुंबईत असे खूपदा पाहायला मिळते. सगळेच नाही, पण काही आहेत. विधान परिषदेत काम केलेल्यांना हे माहिती आहे. पण गाणारांनी शिक्षकांव्यतिरिक्त दुसरं कोणतंही काम केलं नाही. व्रतस्थपणे काम करणारे नेते खूप कमी आहे.'

'आपल्या मार्गात तडजोड न करता काम करीत आहेत. काही आपले संस्थाचालकही गाणारांवर नाराज असतील. कायम विनाअनुदानीत शाळांचा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केला. त्यांनी एकही आश्वासन दिलेलं नाही. भाजपानं ही आश्वासने पूर्ण केली. शिक्षक भरती सुरू केली', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in