MPSC परीक्षेतील टॉपर, PSI अश्विनी केदारीने अत्यंत क्षुल्लक कारणाने गमावला जीव.. त्यावेळी नेमकं काय घडलं?
Ashwini Kedari MPSC Topper Death: MPSC परीक्षेतील टॉपर आणि PSI अश्विनी केदारी हिचा एका दुर्दैवी अपघातामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
ADVERTISEMENT

आदित्य भवार, पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू गावची कन्या आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 2023 च्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी राज्यातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारी अश्विनी केदारी (वय 30 वर्ष) हिचे दुर्दैवी निधन झाले. गेल्या अकरा दिवसांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. गणेश विसर्जनाच्या दिवशी पीएसआय अश्विनी यांचे निधन झाले.
अवघ्या 30 व्या वर्षी अश्विनीने जगाचा निरोप घेतला, या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 28 ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना घडली. अश्विनी अभ्यासासाठी लवकर उठली होती. तिने आंघोळीसाठी हीटर लावून बादलीत पाणी गरम केले होते. यादरम्यान तिला थोडा वेळ झोप लागली. जेव्हा ती उठली तेव्हा पाणी पूर्णपणे उकळले होते. या घटनेबाबत असे सांगितलं जात आहे की, अश्विनीने हीटर बंद करून बादली उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अचानक तिचा पाय घसरला आणि बादलीमधील संपूर्ण उकळते पाणी तिच्या अंगावर पडले. या अपघातात अश्विनी तब्बल 80 टक्के भाजली.
हे ही वाचा>> Pune: पोराचे अंत्यसंस्कार थांबवले, वडील गणेश कोमकरला जेलमधून आणलं तेव्हाच दिला अग्नी.. स्मशानभूमीत नेमकं काय घडलं?
तशाच गंभीर अवस्थेत तिला तात्काळ पिंपरी-चिंचवड येथील डीवाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु सुमारे अकरा दिवस मृत्यूशी अपयशी झुंज दिल्यानंतर अखेर अश्विनीचा काल (7 सप्टेंबर) मृत्यू झाला. दरम्यान, अश्विनीवरील उपचारांच्या खर्चामुळे मदतीसाठी आवाहन देखील करण्यात आलं होतं. ज्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी यासाठी सहकार्यही केलं होतं.
संकटांवर मात करणारी अश्विनी, पण नियतीने....
अश्विनी एका शेतकरी कुटुंबातील होती. अश्विनीने 2019 मध्ये BE(Mech) उत्तीर्ण झाली होती. पुढे तिने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला. UPSC ची देखील तिने तयारी सुरु केली होती. फक्त UPSC च नाही तर तिने प्लॅन बी म्हणून MPSC ची कम्बाईन परीक्षा सुद्धा दिली होती. 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत तिची निवड झाली नव्हती. पण अश्विनी ही जिद्द न हरणारी मुलगी होती. पुढे 2023 च्या परीक्षेमध्ये अश्विनी केदारी ही मुलींमध्ये राज्यात प्रथम आली. कठोर परिश्रम आणि समर्पणाने तिने एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या अश्विनीची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी निवड झाली होती. भविष्यात जिल्हा दंडाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते आणि ती त्या दिशेने तयारी करत होती.
हे ही वाचा>> पुण्यात भररस्त्यातच तरुणाकडून लघुशंका, महिलेनं केला हस्तक्षेप, तरुणांची सटकली नंतर...
तिने कधीही परिस्थिती समोर हार मानली नाही किंवा संकटांना भीक घातली. अशा या लढवय्या अश्विनी केदारी या होतकरू अधिकाऱ्याच्या जाण्याने संपूर्ण तालुक्यावर एक शोककळा पसरली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अश्विनी केदारी ही रोल मॉडेल होती. तिने कोविड काळामध्ये केलेलं अभ्यासाचं नियोजन हे विशेष असल्याने स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी तिच्याकडून मार्गदर्शन घेत होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर सुद्धा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अश्विनीच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मित्र आणि सहकाऱ्यांमध्ये खोल शोककळा पसरली आहे. या दुःखद बातमीने संपूर्ण गाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे.