Pune: पोराचे अंत्यसंस्कार थांबवले, वडील गणेश कोमकरला जेलमधून आणलं तेव्हाच दिला अग्नी.. स्मशानभूमीत नेमकं काय घडलं?
Pune Gangwar: पुण्यातील गोविंदा कोमकरची 5 सप्टेंबरला हत्या करण्यात आली होती. ज्याच्यावर आज (8 सप्टेंबर) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तुरुंगात असलेल्या गणेश कोमकर याला तुरुंगातून स्मशानभूमीत आणण्यात आले होते.
ADVERTISEMENT

पुणे: ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य भागात भर रस्त्यात झालेल्या गँगवॉरने पुणे शहर हादरून गेलं आहे. कुख्यात गुंडगार गणेश कोमकर याचा 18 वर्षीय मुलगा आयुष (उर्फ गोविंदा) कोमकर याची 5 सप्टेंबर रोजी नाना पेठ परिसरात गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या बदला घेण्यासाठी करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, आज (8 सप्टेंबर) वैकुंठ स्मशानभूमी येथे आयुष कोमकरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण यावेळी दुःख आणि भीतीचे वातावरण संपूर्ण परिसरात पाहायला मिळालं.
गणेश कोमकर हा सध्या तुरुंगात आहे. पण मुलाच्या अंत्यसंस्कारसाठी त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला होता. ज्यासाठी काही काळ अंत्यविधी थांबवण्यात आला होता. दरम्यान, यावेळी कोमकर कुटुंबीयांसाठी वैकुंठ स्मशानभूमीत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी दोन पोलीस उपायुक्त हे प्रत्यक्ष स्मशानभूमीत उपस्थित राहून लक्ष ठेवत होते. अखेर काही काळ वाट पाहिल्यानंतर पोलीस गणेश कोमकर याला स्मशानभूमीत घेऊन आले. ज्यानंतर त्याच्या मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण करण्यात आले.
हे ही वाचा>> पुणे: गोविंद कोमकरच्या हत्येची Inside स्टोरी, त्यावेळी नेमकं काय घडलं?
हत्याकांडाची पार्श्वभूमी: वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, ही घटना वनराज आंदेकर याच्या हत्येशी थेट जोडलेली आहे. आंदेकर याची हत्या नाना पेठ परिसरातच झाली होती, ज्यात मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी स्ट्रीट लाइट बंद करून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार केले होते. या प्रकरणात गणेश कोमकर, त्याची पत्नी संजीवनी कोमकर (आंदेकर यांची बहीण), जयंत कोमकर आणि प्रकाश कोमकर यांच्यासह 21 जणांना आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. हत्येचे कारण कौटुंबिक मालमत्ता वाद असल्याचे सांगितले जाते. या कुटुंबातील अंतर्गत कलह इतका तीव्र झाला की, आंदेकर गँगने बदला म्हणून गणेश कोमकर यांच्या मुलाला निशाणा बनवले.
5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी आयुष (गोविंदा) घरी परतत असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये गोविंदाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली.










