पोलीस घरात घुसले आणि शाहरूखने मुलाला ढाल बनवत पिस्तूल रोखलं... मध्यरात्री कशी झाली चकमक?
शाहरुखच्या एन्काऊंटरमुळे पुणे आणि सोलापूर परिसरातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या चकमकीत वापरलेल्या सर्व्हिस पिस्तूल आणि शाहरुखच्या गावठी पिस्तूलचा तपशील तपासला जात आहे.
ADVERTISEMENT

पुणे : रात्री तीन साडेतीनची वेळ... काळाकुट्ट अंधार आणि शांत झोपलेली वस्ती. अचानक एका घरात पोलीस घुसतात, गोळीबार होतो आणि काही वेळात सगळं शांत होतं आणि पोलीस बाहेर येतात. हिंदी चित्रपटातील थरारक दृश्यांना लाजवेल अशा पद्धतीनं सोलापुरातील मोहोळमध्ये ही कारवाई झाली. लांबोटी गावात अट्टल गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याचा एन्काऊंटर झाला.
हे ही वाचा >> "पूल धोकादायक होता तर तिथे...", कुंडमळातील घटनेवरुन राज ठाकरेंचा सरकारवर संताप
पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातलं चर्चेतलं नाही असलेला शाहरूख गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. त्याच्यावर मोक्कासह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. शाहरुखने पोलिसांवर गावठी पिस्तूल रोखून गोळी झाडली. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तर गोळीबारात शाहरुख जखमी झाला. सोलापूर येथील रुग्णालयात उपचारापूर्वीच शाहरूखचा मृत्यू झाला. ही रविवारी पहाटे 3:30 च्या सुमारास ही घटना घडली.
शाहरूख लपून बसल्याची माहिती मिळाली आणि सापळा रचला
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने ही कारवाई केली. पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, शाहरुख लांबोटी गावातील नरुटे वस्तीत आपल्या नातेवाईक राजू अहमद शेख याच्या घरात दुसऱ्या मजल्यावर लपून बसलाय. 15 दिवसांपासून तो याच ठिकाणी आश्रयाला होता. पोलिसांनी मोहोळ पोलिसांच्या सहकार्यानं पहाटे 3:30 च्या सुमारास या ठिकाणी सापळा रचला.
खाली राहणाऱ्या महिलेला घेऊन पोलीस वर गेले
पोलीस पथकाने दुसऱ्या मजल्यावर जाण्यापूर्वी खालच्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेला शाहरुखचा फोटो दाखवला आणि तो याच ठिकाणी राहतो का, याची खात्री केली. महिलेने वरच्या मजल्यावरील एका छोट्या खोलीकडे बोट दाखवत शाहरुख तिथे राहत असल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी त्या महिलेला सोबत घेऊन वरचा मजला गाठला. शाहरुख त्याच्या पत्नीसोबत त्या खोलीत होता.
हे ही वाचा >>आत्या अन् भाचीच्या बेडरूममध्ये बराच वेळ गप्पा, नातेवाईक येताच दिसल्या अशा स्थितीत की...
पोलिसांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळाने शाहरुखच्या पत्नीने "कोण आहे?" असं विचारलं. पोलिसांसोबत असलेल्या महिलेनं स्वतःचे नाव सांगत दरवाजा उघडण्यास सांगितलं. दरवाजा उघडताच पोलिस आत घुसले. पोलिसांना पाहताच शाहरुखने गावठी पिस्तूल काढून पोलिसांवर ताणलं. एवढंच नाही, तर त्याने जवळ झोपलेल्या लहान मुलाला ढाल बनवण्याचा प्रयत्न करत पोलिसांवर गोळी झाडली.
शाहरूखने मुलालाच ढाल बनवलं
पोलिसांनी प्रसंगावधान राखत लहान मुलाचा जीव वाचवला आणि स्वसंरक्षणासाठी शाहरुखच्या पायावर गोळी झाडली. यात शाहरुख जखमी झाला, तरीही त्याने पुन्हा पिस्तूल पोलिसांवर रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी आणखी गोळ्या झाडल्या, ज्यामुळे शाहरुख गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
शाहरुखचा गुन्हेगारी इतिहास
पोलीस सूत्रांनुसार, शाहरुख शेख हा हडपसर परिसरातील सय्यद नगर, मोहम्मदवाडी रोड येथील रहिवासी होता. त्याच्यावर पुणे शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारहाण यासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. मकोका कायद्यांतर्गतही त्याच्यावर कारवाई झाली होती. पोलिसांपासून बचावण्यासाठी त्याने पुण्यातून पळ काढला आणि लांबोटी गावात लपून बसला होता. गेल्या अनेक दिवसांपासून पुणे गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते.
शाहरुखच्या एन्काऊंटरमुळे पुणे आणि सोलापूर परिसरातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या चकमकीत वापरलेल्या सर्व्हिस पिस्तूल आणि शाहरुखच्या गावठी पिस्तूलचा तपशील तपासला जात आहे. शाहरुखला नेमक्या किती गोळ्या लागल्या, याची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर समोर येणार आहे.
पुणे शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शाहरुख हा अत्यंत धोकादायक गुन्हेगार होता. त्याला ताब्यात घेताना पोलिसांनी संयम दाखवला, मात्र त्यानं पोलिसांवर गोळी झाडल्याने स्वसंरक्षणासाठी गोळीबार करावा लागला. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, शाहरुखच्या साथीदारांचाही शोध घेतला जात आहे.