Maharashtra cabinet expansion : “8 ते 10 जणांना मंत्रिपद मिळेल, बाकीचे…” -विनायक राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

-राकेश गुडेकर, रत्नागिरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार उरकला जाणार असून, अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेसमोर नाराजांची मनधरणीचं आव्हान असणार आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे.

रत्नागिरी येथे माध्यमांशी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले, “40 पैकी 8 ते 10 जणांना मंत्रिपद मिळेल, बाकीचे एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे झाले”, अशा शब्दात विनायक राऊत यांनी टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“तब्बल 39 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय असं ऐकिवात आहे. प्रत्यक्ष शपथ घेतील, तेव्हा ते खरं ठरेल. दुर्दैवानं 39 दिवसांत मंत्रालयाचं सचिवालय झालं. महाराष्ट्र संपूर्ण उघडा पडला. पूर परिस्थितीकडे पाहायला कोणी नाही. महिलांवर अत्याचार होताहेत तिकडे पाहायला कोणी नाही, पण तरीसुद्धा आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत”, असं विनायक राऊत मंत्रिमंडळ विस्तारावर म्हणाले.

“शिंदे गटामध्ये नाराजी आहे, कारण 40 लोकांना मंत्रीपदाचं आमिष दाखवून शिवसेनेपासून दूर घेऊन गेले आहे. 40 पैकी 8 ते 10 जणांना मंत्रिपद मिळेल. बाकीचे एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे झाले. काही नाराज हे सुरुवातीपासून शिवसेनेच्या संपर्कात आहेत, त्यांची अडचण ही गंभीर आहे. पण तरीसुद्धा त्यांना शिवसेनेत येण्यासाठी शिवसेनेकडून कोणतीही आमिषं, स्वार्थाची भाषा होणार नाही. नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांच्यासारखं ज्यांना शिवसेनेप्रति विश्वास आहे, अशांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत”, अशी भूमिका विनायक राऊत यांनी मांडली.

ADVERTISEMENT

उदय सामंत, अब्दुल सत्तारांवर विनायक राऊतांचा निशाणा

“औट घटकेचं मंत्रिपद मिळेल, त्यामध्ये त्यांनी समाधानी राहावं”, असा टोला विनायक राऊत यांनी आमदार उदय सामंत यांना लगावला आहे. त्याचबरोबर टीईटी घोटाळा प्रकरणात आता अब्दुल सत्तारांवर आरोप होऊ लागले आहेत. “टीईटी घोटाळा हा केवळ सचिवांनी केलेला नसून, त्यामध्ये एका वजनदार मंत्र्याचा जो हात होता, तो कोणाचा असेल हे आता अब्दुल सत्तारांच्या मुलीनं दाखवून दिलं आहे”, असा आरोपही खासदार राऊत यांनी केला.

ADVERTISEMENT

दीपक केसरकर, राणे दोन्हीही वाया गेलेली प्रकरणं; विनायक राऊतांचा टोमणा

दीपक केसरकर आणि राणे हा संघर्ष पुन्हा एकदा दिसून येत आहे. राणे-केसरकर वादावर बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले, “केसरकर काय किंवा राणे काय या दोघांकडेही आम्ही लक्ष देत नाही. कारण दोन्हीही वाया गेलेली प्रकरणं आहेत”, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.

“निवडणूक आयोगाने त्याप्रमाणे काम करावं”

“आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश निवडणूक आयोगाला दिलेले आहेत, त्याप्रमाणे त्यांनी काम करावं, ही साधी अपेक्षा आहे. आमची बाजू सत्याची आहे, त्यामुळे आम्हाला अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही”, असंही राऊत यावेळी म्हणाले.

बिहारमध्ये राजकीय अस्थिरता, नितीश कुमारांबद्दल राऊत म्हणाले…

बिहारमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होताना दिसत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले, “नितीश कुमार नाराज असणार कारण यांची बॉसिंग कोणाला सहन होणार.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT