बदलापूर अत्याचार: डोक्यात तिडीक जाणाऱ्या शाळेच्या 'त्या' चुका!

निलेश झालटे

ADVERTISEMENT

शाळेच्या डोक्यात तिडीक जाणाऱ्या 'त्या' चुका!
शाळेच्या डोक्यात तिडीक जाणाऱ्या 'त्या' चुका!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूरच्या या प्रकरणात शाळा कुठे चुकलीय?

point

शाळांबाबत नेमकं नियम काय सांगतात?

point

त्या शाळेने साधे नियमही का पाळले नाही?

Badlapur school news: मुंबई: आपण मुलांना शाळेत घालताना शाळेचा दर्जा कसा आहे, तिथं कसं शिकवलं जातं, सोयीसुविधा काय आहेत या गोष्टीना प्राथमिकता देतो आणि अॅडमिशन घेऊन टाकतो. मात्र, आता या सगळ्या प्राथमिकता बदलाव्या लागणार आहेत का? असा सवाल बदलापूरच्या घटनेनंतर अनेक पालकांच्या मनात यायला लागल्या आहेत. (badlapur sexual assault case school did not follow even simple rules how did the accused spy on little girls)

ADVERTISEMENT

आता मुलांचं अॅडमिशन घेताना तिथं सीसीटीव्ही आहेत का? मुलांची काळजी घेणारे शिक्षक, तिथले कर्मचारी कसे आहेत, आपली मुलं सुरक्षित कशी राहतील? या गोष्टींचा आता प्राधान्याने विचार करावाच लागणार आहे. बऱ्याच शाळांमध्ये आता या प्रश्नांवर काम सुरु झालं असेल. मात्र हे सगळं व्हायला बदलापूरसारखी एक घटना घडावी लागते हे दुर्देव आहे.

हे ही वाचा>> Badlapur: 'तुझा रेप झालाय का?, की तू बातमी करतेस...', ही आहे 'त्या' संपूर्ण प्रकरणाची Inside स्टोरी

आरोपीला ताब्यात घेऊन कोठडीत पाठवलंय. राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर आता बदलापूरच्या या शाळेवर प्रशासक नियुक्त केला आहे. बदलापूरसह महाराष्ट्रात आंदोलनांचा भडका उडाला आहे. मात्र शेवटी महत्वाचा प्रश्न हाच उरतो की, या सगळ्यात शाळेचं चुकलं कुठं? नियम काय सांगतात?

हे वाचलं का?

बदलापूरचं नेमकं प्रकरण काय?

आधी हे प्रकरण थोडंसं रिव्हीजिट करुयात. 12 ते 15 ऑगस्टदरम्यान या दोन चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटना घडल्या. यातील एका मुलीने शारीरिक त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं. असाच त्रास मैत्रिणीसोबतही होतोय असंही या मुलीने सांगितलं. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना संपर्क केला. तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यास तयार नसल्याचं त्यांना समजलं. 

दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं.  ज्या शाळेत ही घटना घडली, ती बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. आपल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समजल्यानंतर दोन्ही मुलींचे पालक प्रचंड हादरले. त्यांनी 16 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 12 तासांचा विलंब केला, तसा आरोप संबंधित मुलींच्या कुटुंबीयांनी केला. 

ADVERTISEMENT

अखेर काही लोकांनी हस्तक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी सुरू झाली आणि दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यापर्यंत पोलिस पोहोचले. अखेर अक्षय शिंदे नावाच्या नराधम आरोपीला अटक करण्यात आली 24 वर्षीय आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार आहे. त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती. 

ADVERTISEMENT

विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देण्यात आली होती. याच अक्षय शिंदेंने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केले. संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी बदलापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच आंदोलकांनी शाळेबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर शाळेचं गेट तोडून आंदोलक आत घुसले आणि शाळेमध्ये तोडफोड केली. त्याचसोबत आंदोलकांनी रेल्वे स्टेशनकडे धाव घेऊन रुळावर तीव्र आंदोलन केलं.

हे ही वाचा>> Badlapur: नराधम अक्षय शिंदेबद्दल शेजाऱ्यांनी दिली धक्कादायक माहिती, नेमकं काय सांगितलं?

शेवटी पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना पांगवलं. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले. तसेच, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाईल, असे राज्य सरकारने जाहीर केले.  

बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने SIT स्थापन केली असून ज्येष्ठ IPS अधिकारी आरती सिंह या त्याच्या प्रमुख असतील. या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा तर केवळ ट्रेलर म्हणावा लागेल, कारण दिवसभर बऱ्याच घडामोडी बदलापुरात मंगळवारी घडल्या आणि बुधवारी राज्यासह देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

बदलापूरच्या या प्रकरणात शाळा कुठे चुकलीय आणि नियम काय सांगतात हे जाणून घेऊया

घरानंतर मुलांसाठी सर्वात महत्त्वाचं ठिकाण असते शाळा. तिथं त्यांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होते. पण अशा घटना घडल्यानंतर शाळा कितीही चांगली असली तरी पालकांच्या मनात एक भीती निर्माण होते. त्यामुळं शाळांसाठी सरकारनं याआधीच बरेच नियम बनवले आहेत. 

शाळांमध्ये सखी सावित्री समिती असणंही आवश्यक आहे. शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्यात यावी, अशी घोषणा सरकारकडून मार्च 2022 मध्ये करण्यात आली होती. 'राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून 'सखी सावित्री' समितीचे गठन करण्यात येत आहे' असं शासनाच्या जीआर मध्ये म्हटलेलं आहे. 

वेगवेगळ्या कार्यशाळा, समुपदेशन, शिक्षणाचा दर्जा, विकास आणि उपक्रमांसह या समितीची तशी बरीच कामं आहेत. यातलं महत्त्वाचं एक काम आहे ते म्हणजे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत, असं निकोप वातावरण निर्माण करणं. सोबतच शाळेतल्या विद्यार्थ्यांना अत्याचारांबद्दलची तक्रार दाखल करण्यासाठी POCSO कायद्यातल्या ई-बॉक्सची माहिती देणं, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या CHIRAG अॅपबद्दलची माहिती, 1908 या चाईल्ड हेल्पलाईनबद्दलचे सूचना फलक शाळेत लावण्याची खातरजमा या समितीने करणं अपेक्षित आहे.

आधीच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक आहे, अशी घोषणा मार्च 2022 मध्ये  केली होती. मात्र या शाळेच्या सीसीटीव्हीचा घोळ आहे. शिवाय शाळेमध्ये नेमणूक करण्यात येत असलेल्या व्यक्तीची वैयक्तिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी तपासली जाणंही महत्त्वाचं आहे. प्रत्येक शाळा, आश्रमशाळा, हॉस्टेलमध्ये दर्शनी भागात तक्रारपेटी बसवणं आवश्यक आहे. ही तक्रारपेटी आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मुख्याध्यापक, पोलीस प्रतिनिधी, पालक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासमोर उघडण्यात यावी आणि त्यानुसार कारवाई करावी असाही नियम आहे.

बदलापूर प्रकरणात मात्र शाळेकडून उच्च दर्जाचा हलगर्जीपणा झाल्याचं स्पष्ट दिसतंय. बदलापूर येथे झालेल्या घटनेनंतर पीडित चिमुकलीच्या शाळेत सीसीटीव्ही नसल्याचे समोर आलंय. घटनेनंतर आता सरकारला पुन्हा जाग आलीय. दीपक केसरकर यांनी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आले आहे, असं सांगितलंय. सरकारी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. खासगी शाळांनाही हे अनिवार्य आहे, पण या शाळेतील सीसीटीव्ही बंद असल्याचं आढळून आलं. त्यामुळे सीसीटीव्ही बंद असेल तर जबाबदारी शाळेची असणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे मुलींना शौचालयात नेण्याची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांकडे का दिली नाही? हा प्रश्न देखील आंदोलकांसह अनेकजण विचारत आहेत. आरोपी अक्षय शिंदे या चिमुकल्यांपर्यंत पोहोचून अत्याचार करेपर्यंत इथली व्यवस्था काय करत होती? असाही सवाल उपस्थित होतोय. आता मंत्री शंभूराज देसाईंनी यावर देखील आदेश दिलेत. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी वॉचमन कंत्राटी पद्धतीने कामावर आहेत, त्यांची पोलीस पडताळणी येत्या 8 दिवसांत करणे आवश्यक असून, काम करणाऱ्या सर्व चौकीदारांची पोलीस पडताळणी करून घेण्याचे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. 

महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना संपूर्ण महाराष्ट्रात हे काम देण्यात आले आहे. शिवाय सरकारकडून राज्यातील सर्व आयटीआयसह मुंबई उपनगरमधील महाविद्यालयांमध्ये महिलांना स्व-सरंक्षणाचे प्रशिक्षण देण्याचं देखील सांगण्यात येतंय.  

आता नियमांवर बोललं जाईल, त्यांच्या अमलबजावणीवर काही दिवस जोरही दिला जाईल. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. दोषींना शिक्षा कधी मिळेल याची वाट पीडीतेच्या घरच्यांसह सगळेच पाहात राहतील. मात्र त्या दोन चिमुकल्यांच्या मनावरचे ओरखडे कधी आणि कसे पुसले जातील हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहील. आता आपण काय करु शकतो तर अशा घटना घडू नये यासाठी आपल्या मुलांच्या शाळांमध्ये किंवा आपल्या जवळच्या शाळांमध्ये या नियमांचं पालन होतंय का? हे तपासून घेऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पाल्यांना शिक्षण, अभ्यास या गोष्टींसह अशा नराधम लोकांपासून सावध राहण्याचं, असं काही घडत असेल तर ते निर्भिडपणे सांगण्याचं धाडस देणं आवश्यक आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT