बीड: पतीला दारूचं व्यसन अन् सासू-सासऱ्यांचे टोमणे... अंबाजोगाईत विवाहितेनं संपवलं आयुष्य! तिघांवर गुन्हा दाखल
बीडच्या अंबाजोगाई शहराजवळ असलेल्या चनई येथे सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला वैतागून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीला दारूचं व्यसन अन् सासू-सासऱ्यांचे टोमणे...
बीडच्या अंबाजोगाईत विवाहितेनं संपवलं आयुष्य!
महिलेच्या पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
रोहिदास हातागळे - बीड : बीडच्या अंबाजोगाई शहराजवळ असलेल्या चनई येथे सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला वैतागून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
पतीला दारूचं व्यसन आणि सासू-सासऱ्यांचे टोमणे...
बापू अर्जुन कांबळे (रा. डिसकळ, ता. कळंब, जि. धाराशीव) यांची मुलगी भाग्यश्री हिचं पाच वर्षांपूर्वी चनई येथील रहिवासी असलेल्या अजय तुकाराम चौरे याच्याशी लग्न झालं होतं. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सर्व काही ठिक चाललं होतं पण काही काळानंतर, पतीला अजयला दारूचं व्यसन जडलं. दारूच्या नशेत तो आपल्या पत्नीला सतत मारहाण करायचा. इतकेच नव्हे तर, पीडितेची सासू अयोध्या आणि सासरे तुकाराम हे नेहमी आपल्या सुनेला "घरकाम येत नाही" आणि "तू संसार करू शकत नाहीस" असे टोमणे मारून तिचा मानसिक छळ करत होते. दरम्यान, महिलेची मुलगी आम्रपाली आजारी असल्यामुळे तिच्या उपचारासाठी भाग्यश्रीच्या वडिलांकडे 5 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण गरिबीमुळे बापू कांबळे यांनी 2 ते 3 हजार रुपये पाठवले. मात्र, पूर्ण पैसे का दिले नाहीत? यावरून अजयने भाग्यश्रीला मारून टाकण्याची धमकी दिल्याचा देखील आरोप आहे.
हे ही वाचा: आधी भाजप आमदार, आता राष्ट्रवादी मंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल; भिगवण कथित अपहरण प्रकरणाला राजकीय वळण
झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या
या जाचाला कंटाळून अखेर भाग्यश्रीने 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास तिच्या राहत्या घरासमोरील सीताफळच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच, मुलीच्या माहेरच्या लोकांनी थेट अंबाजोगाईत धाव घेतली आणि आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी तिचा पती अजय चौरे, सासू अयोध्या चौरे आणि सासरे तुकाराम चौरे हे जबाबदार असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
हे ही वाचा: बीड : महादेव मुंडे यांच्या मुलाला कराडच्या समर्थकाकडून मारहाण, कुटुंबियांचा आरोप; मुंडेंच्या पत्नीचे पोलिस अधीक्षकांना पत्र
विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये सासरच्या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 108, 115 (2), 3(5), 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविकुमार राजेंद्र पवार करत असल्याची माहिती आहे.










