बीड : लेकीच्या शिक्षणासाठी 'माऊली' अनवाणी धावली, आता भारताच्या उपराष्ट्रपतींचा मोठा निर्णय!
मॅरेथॉनमध्ये हातात चप्पल घेऊन धावणाऱ्या 47 वर्षीय रमाबाई रणवीर या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. या मातृत्वाच्या आणि संघर्षाच्या भावनेचा गौरव थेट देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लेकीच्या शिक्षणासाठी 'माऊली' अनवाणी धावली
भारताच्या उपराष्ट्रपतींचा मोठा निर्णय!
Beed News, रोहिदास हातागळे : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकासाठी अनवाणी आणि हातात चप्पल घेऊन मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या 47 वर्षीय रमाबाई रणवीर या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या असीम धैर्याची आणि संघर्षाची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. अंबाजोगाई येथील मॅरेथॉनमधील त्यांच्या या जिद्दीची बातमी प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर देश-विदेशातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या मातृत्वाच्या आणि संघर्षाच्या भावनेचा गौरव करत थेट देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी रमाबाईंना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.
मदतीचा ओघ सुरु झाला
रमाबाईंच्या या संघर्षाची दखल सर्वप्रथम स्थानिक प्रशासनाने घेतली. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी 50 हजार रुपये, तर बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. वहाब ए. सय्यद (न्यायाधीश) यांनी तातडीची मदत देऊन त्यांना मोठा आधार दिला. यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही रमाबाईंच्या धैर्याचे कौतुक करत 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. याशिवाय, क्रिकेट जगतातील दिग्गज सचिन तेंडुलकर यांनी रमाबाईंना धावण्यासाठी विशेष शूज भेट देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
हे ही वाचा : ममता बॅनर्जींच्या पक्षाला मिळालं नवं चिन्ह, फुटीर गटाच्या चिन्हालाही निवडणूक आयोगाकडून मान्यता
मिळणार पक्के घर
या घटनेची अत्यंत संवेदनशील दखल देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी घेतली असून, त्यांनी रमाबाईंच्या दोन्ही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील 'पोथरा' या त्यांच्या मूळ गावी रमाबाईंना 'रमाई आवास योजने'अंतर्गत पक्के घर बांधून दिले जाणार आहे. तसेच 'आवादा फाउंडेशन'कडून 51 हजार रुपयांची मदत देत त्यांच्या कुटुंबाचा शैक्षणिक भार हलका करण्यात आला आहे.
हे ही वाचा : आदित्य ठाकरेंना थेट 500 कोटींची मानहानीची नोटीस, नेमकं प्रकरण काय?
मुली काय शिकताहेत?
सध्या रमाबाईंची लहान मुलगी आरती नांदेड येथे बी.एस्सी. (कॉम्प्युटर) चे शिक्षण घेत आहे, तर मोठी मुलगी पूजा ज्ञानदीप अकॅडमी (अंबाजोगाई) येथे पोलीस भरतीची तयारी करत आहे. मुलींच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी रमाबाई सध्या त्याच अकॅडमीत स्वयंपाकाचे काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. आजवर विविध संवेदनशील संस्था व प्रशासनाकडून 5 लाख रुपयांहून अधिक मदत मिळाली असली, तरी कौटुंबिक परिस्थिती आणि मुलींच्या पुढील उच्च शिक्षणाचा विचार करता या जिद्दी आईला अजूनही आर्थिक मदतीच्या हाताची गरज आहे.
