फॉर्च्युनरचा वेग 150, मिसिंग लिंकमध्ये अपघात कसा झाला? पोलिसांनी सांगितलं...

मुंबई तक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक' (Missing Link) बोगद्यात एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला असून, यामध्ये तुषार भूमकर या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

Missing Link Accident
Missing Link Accident
Google CTA

बातम्या हायलाइट

point

फॉर्च्युनरचा वेग 150

point

मिसिंग लिंकमध्ये अपघात कसा झाला?

point

पोलिसांनी सांगितलं...

Missing Link Accident : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्या कनेक्टिंग लिंकवर अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी असतानाही काही वाहनांचा बेकायदेशीर वावर सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. बंदीचे फलक स्पष्टपणे लावलेले असतानाही अनेक अवजड वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून या मार्गावर प्रवेश करत आहेत. महामार्ग पोलीस अशा वाहनांना रोखून पुन्हा लोणावळ्याच्या दिशेने माघारी पाठवत असले, तरी चालकांचा निष्काळजीपणा आणि भरधाव वेग यामुळे या मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

फॉर्च्युनरचा वेग 150 किमी प्रतितास

याच नियमावलीच्या उल्लंघनातून काल 'कनेक्टिंग लिंक'वर एका भीषण अपघातात तुषार भूमकर नावाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बंदी असलेल्या क्षेत्रात अचानक शिरलेल्या एका मालवाहू टेम्पोला पाठीमागून आलेल्या भरधाव फॉर्च्युनर कारने जोरदार धडक दिली. या घटनेनंतर महामार्ग पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि वाहनचालकांच्या बेश शिस्तीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघाताच्या वेळी फॉर्च्युनर कारचा वेग तब्बल 150 किमी प्रतितास होता, तर टेम्पोचालकानेही बंदी आदेशांकडे दुर्लक्ष करून या मार्गावर प्रवेश केला होता.

हे ही वाचा : बीडमध्ये तब्बल दोन कोटींचं बनावट खाद्य तेल कसं तयार करण्यात आलं?

चालकांचे नियमांकडे दुर्लक्ष

या संदर्भात महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्गिकेच्या प्रवेशद्वारावर स्पष्ट सूचना फलक लावूनही अनेक चालक 120 ते 140 च्या वेगाने गाड्या चालवत फलकांकडे दुर्लक्ष करतात. महामार्ग पोलिसांचे पथक या ठिकाणी उपस्थित राहून बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्या वाहनांना बाहेर काढण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते. मात्र, पोलिसांना चकवून किंवा नजरचुकीने आत येणाऱ्या वाहनांमुळे अशी जीवितहानी घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून काल घडलेल्या अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा : रस्ते अपघाताने मृत्यू...पण 3 महिन्यांनी मृतदेह काढला बाहेर, नेमकं काय घडलं?

कठोर उपायांची गरज

गेल्या तीन महिन्यांत या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 621 अवजड वाहनांवर महामार्ग पोलिसांनी धडक कारवाई करत 7 लाख 38 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र, केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नसून अधिक कठोर उपायांची गरज व्यक्त केली जात आहे. स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालता महामार्गावरील वाहतुकीच्या नियमांचे व वेगमर्यादेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनात्मक पत्रक महामार्ग पोलिसांनी सर्व वाहनचालकांसाठी जारी केले आहे.