पाकिस्तानमध्ये HIV संक्रमण महामारीप्रमाणे पसरलं, रुग्णांमध्ये 200 टक्क्यांनी वाढलं, WHO महत्त्वाचा इशारा
योग्य वेळी प्रतिबंधक उपाययोजना न केल्यास पुढील पिढीसाठी हे मोठे संकट ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पाकिस्तानमध्ये HIV संक्रमण महामारीप्रमाणे पसरलं
रुग्णांमध्ये 200 टक्क्यांनी वाढलं, WHO महत्त्वाचा इशारा
HIV : पाकिस्तानमध्ये एचआयव्ही (HIV) संक्रमण वेगाने वाढत असून ते गंभीर आरोग्यसंकटाच्या दिशेने जात असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ताज्या अहवालानुसार, एचआयव्हीचा प्रादुर्भाव आता केवळ काही विशिष्ट गटांपुरता मर्यादित न राहता महिला, मुलं आणि सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे. योग्य वेळी प्रतिबंधक उपाययोजना न केल्यास पुढील पिढीसाठी हे मोठे संकट ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या 15 वर्षांत पाकिस्तानमध्ये एचआयव्हीच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. 2010 मध्ये देशात 16 हजार नवे एचआयव्ही रुग्ण आढळले होते. 2024 पर्यंत ही संख्या 48 हजारांवर पोहोचली असून तब्बल 200 टक्क्यांनी वाढ झाल्याचे WHO ने स्पष्ट केले आहे. ही वाढ केवळ आकड्यांची नसून संक्रमण समाजाच्या सर्व स्तरांमध्ये पसरत असल्याचे त्यावरून दिसते.
WHO चा गंभीर इशारा
पूर्वी एचआयव्ही प्रामुख्याने ड्रग्ज घेणारे, संक्रमित रक्त चढविणारे किंवा उच्च-जोखमीच्या गटांपुरते सीमित होते. मात्र आता हे संक्रमण मुलांपासून ते महिलांपर्यंत आणि सामान्य लोकांपर्यंत झपाट्याने पसरण्यास सुरुवात झाली आहे. WHOचे प्रतिनिधी डॉ. लुओ दापेंग यांनी सांगितले की, मुलांवर होणारा परिणाम पाकिस्तानच्या भविष्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. “ही महामारी रोखण्यासाठी सरकार, आरोग्य संस्था आणि संपूर्ण समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
संक्रमण वाढण्याची मुख्य कारणे
आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी, असुरक्षित इंजेक्शन्सचा वापर, दूषित रक्त चढविण्याचे प्रकार, रुग्णालयांमधील संक्रमण नियंत्रणाची कमतरता, गरोदर महिलांची एचआयव्ही चाचणी न होणे आणि सुरक्षित लैंगिक व्यवहारांची माहिती नसणे हे संक्रमण वाढण्यामागील प्रमुख घटक असल्याचे WHOच्या अहवालात नमूद केले आहे.










