समृद्धी महामार्गावर 'त्या' 8 जणींचा नेमका कसा गेला जीव?, 'ती' एक गोष्ट अन् भयंकर शेवट...
Samruddhi Expressway Accident: जालना येथे समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला आणि पाच जणी गंभीर जखमी झाल्या.
ADVERTISEMENT

Samruddhi Highway Accident Death: गौरव साळी, जालना: जालना जिल्ह्यातून एका भीषण रस्ते अपघाताची बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ झालेल्या या भीषण अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मजुरांना घेऊन जाणारा एक मिनी-पिकअप ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व महिला समृद्धी महामार्गावरील मजूर होत्या आणि त्या वाहनातून प्रवास करत होत्या. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजुरांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक रहिवासी, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले, आणि जखमींना प्रथम जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि नंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
निष्काळजीपणामुळे अपघात, चालक ताब्यात
प्राथमिक तपासात ट्रक चालकाचा अतिवेग आणि निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.









