इर्शाळवाडी : दरडीने गिळलं गाव, 5 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी इर्शाळवाडी गाव आहे. या गावावर 20 जुलै रोजी रात्री दरड कोसळली. यात 5 जणांचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

Irshalwadi Landslide News : गुरुवारची (20 जुलै) सकाळ महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी घेऊनच उगवली. रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावाचा दरडीने घास घेतला. इर्शाळगडाच्या डोंगराचा एक भाग इर्शाळवाडी गावावर कोसळला. 48 घरांची ही वाडी असून, मध्यरात्री ही घटना घडली असून, 100 पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून, एनडीआरएफकडून युद्ध पातळीवर बचाव व मदत मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही घटनास्थळी दाखल झाले असून, इर्शाळवाडीच्या घटनेने माळीण दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या.
रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळवाडी गाव आहे. हे गाव कर्जत तालुक्यात येते. गुरूवारी पहाटे (20 जुलै) लोक गाढ झोपेत पावसामुळे असतानाच गावावर दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले. जवानांकडून तातडीने बचाव व मदत कार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार 75 जणांना बाहेर काढण्यात आलं. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 70 जणांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी गावाला भेट दिली. परिस्थिती पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.