वेदर रिपोर्ट : 72 तास, कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार, पाऊस कुठले भाग झोडपणार?
महाराष्ट्रात सध्या पावसाची उघडीप पाहायला मिळत असताना पुढील काही दिवसांच्या हवामानाबाबत महत्त्वाचा अंदाज समोर आला आहे. नवीन कमी दाबाचं क्षेत्र कुठे तयार होण्याची शक्यता आहे? त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नेमकी कोणत्या तारखांना आहे?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
72 तास, कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार
पाऊस कुठले भाग झोडपणार?
Maharashtra Weather : महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या राज्यात पावसासाठी खूप जास्त पोषक वातावरण नसले, तरी येत्या काही दिवसांत चित्र बदलणार आहे. गुजरातपासून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या चक्राकार वाऱ्यांपर्यंत पसरलेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातून खेचली जाणारी आर्द्रता यामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल घडत आहेत. तसेच बंगालच्या उपसागरात 11 सप्टेंबरच्या सुमारास नवीन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढेल.
'या' जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा प्रभाव फारसा असणार नाही. 9 सप्टेंबरला केवळ नंदुरबार व धुळे जिल्ह्यात, तर 10 सप्टेंबरला नांदेड जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांत उर्वरित महाराष्ट्रात हवामान मुख्यत्वे कोरडे किंवा संथ राहील.
हे ही वाचा : फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी मराठ्यांचा बळी घेतला, आपण बदला नक्की घेऊ; जरांगेंचं थेट आव्हान
'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
मात्र, 11 सप्टेंबरपासून राज्यात पावसाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होईल. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा पहिला प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्यात दिसून येईल. 11 सप्टेंबरला हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी व लातूर येथे वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. 12 सप्टेंबर रोजी या प्रणालीचा प्रभाव अधिक तीव्र होऊन चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय नाशिक, ठाणे, रायगड, पुणे घाट परिसर, जळगाव आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather : गणेशोत्सवाच्या तोंडावर पाऊस झाला गायब? IMD चा महत्त्वाचा अंदाज
मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस
एकंदरीत 13 आणि 14 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 50 टक्क्यांहून अधिक भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातही काही ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. सुरुवातीचे दोन दिवस शांततेचे असले तरी 11 ते 14 सप्टेंबर दरम्यान हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
