मुंबईची खबर : डबल डेकर बसची उंची होणार कमी, नेमकं कारण काय?
मुंबईतील डबल डेकर बससंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बस उत्पादक कंपनीला नोटीस पाठवून सुमारे 50 नवीन इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसेसची उंची 17 सेंटीमीटरने कमी करण्यास सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : डबल डेकर बसची उंची होणार कमी
नेमकं कारण काय?
Mumbai News : मुंबईतील डबल डेकर बससंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कुर्ला येथील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पुलाखाली डबल डेकर बसची उंची जास्त ठरत असल्याने या बसच्या सेवेसमोर अडचण निर्माण झाली आहे. बसचे छत पुलापेक्षा उंच असल्यामुळे बस जाण्यास अडचण येत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘बेस्ट’ समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी गुरुवारी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले.
17 सेमीने उंची कमी
यासाठी बस उत्पादक कंपनीला नोटीस पाठवून सुमारे 50 नवीन इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसेसची उंची 17 सेंटीमीटरने कमी करण्यास सांगण्यात आले आहे. जुन्या साध्या डबल डेकर बसची उंची 458 सेंटीमीटर होती, तर नवीन बसेसची उंची 475 सेंटीमीटर आहे. जुन्या बसच्या उंचीनुसार नवीन बसेसची उंची 458 सेंटीमीटरपर्यंत छाटून कमी करण्यात यावी, असे त्यांनी सुचवले. या उंचीच्या बदलामुळे कुर्ला आणि वांद्रे स्थानकांदरम्यान वांद्रे-कुर्ला संकुलातून (बीकेसी) सुरळीतपणे बससेवा सुरू ठेवणे शक्य होणार आहे.
हे ही वाचा : भाऊ बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात, इकडे बाहेर बहिणीने महिलेला संपवलं; नेमकं काय घडलं?
5 ओपन डेक बसेस
कुर्ला ते बीकेसी आणि वांद्रे रेल्वे स्थानक पूर्व या मार्गावर डबल डेकर बसची प्रचंड मागणी आहे, त्यामुळे प्रशासनाला हा मार्ग लवकरात लवकर सुरू करायचा आहे. सुधारित लीज भाड्याने लवकरच ताफ्यात दाखल होणाऱ्या 150 नवीन डबल डेकर बसेसपैकी 5 बसेस 'ओपन डेक' (छताशिवाय) असणार आहेत, अशी घोषणाही तृष्णा विश्वासराव यांनी केली. या ओपन डेक बसेस नागरिक वाढदिवस, विविध कार्यक्रम किंवा मरिन ड्राईव्ह, कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंकवर आनंद सफारीसाठी (जॉयराईड्स) भाड्याने घेऊ शकतील.
हे ही वाचा : संतोष पंडितांना कायद्याच्या कचाट्यात अडकवलं की अडकले? पडद्यामागची इनसाईड स्टोरी...
वर्षाअखेरीस 150 नवीन डबल डेकर बसेस
याआधी अशा प्रकारच्या ओपन डेक बसेसना वीकेंडला प्रचंड प्रतिसाद मिळत असे आणि विकेंडच्या दोन दिवसांत सुमारे 4000 प्रवासी या सफारीचा आनंद घेत असत. यातून 'बेस्ट'ला अंदाजे 2 लाख रुपयांपर्यंतचा महसूल मिळायचा, त्यामुळे हा उपक्रम पुन्हा सुरू झाल्यास फायदेशीर ठरेल. दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस 150 नवीन डबल डेकर बसेसचा पुरवठा सुरू होईल अशी बेस्टला अपेक्षा आहे.
