मुंबईची खबर : कोट्यवधींचा झोपडपट्टी पुनर्वसन फ्लॅट घोटाळा, 47 जणांना कोणी फसवलं?
मुंबई पोलिसांनी SRA सदनिकांच्या व्यवहारांमधील कथित फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, एकूण 47 जणांची 5.57 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : कोट्यवधींचा झोपडपट्टी पुनर्वसन फ्लॅट घोटाळा
47 जणांची फसवणूक
Mumbai News : मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) प्रकल्पग्रस्तांसाठी (PAP) असलेल्या घरांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल 5.57 कोटी रुपयांच्या या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या एका आमदाराचे माजी वैयक्तिक सचिव आणि सध्या एका खासदाराचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले विश्वनाथ जाधव यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारीत काय म्हटलंय?
आकाश राधेश्याम सोनी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2017 मध्ये त्यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची गाठ शैलेश काकण व त्याच्या साथीदारांशी पडली होती. आरोपींनी वरिष्ठ एसआरए अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी उत्तम संबंध असल्याचे सांगून मुंबईतील अंधेरी, सांताक्रूझ, वांद्रे, कांदिवली आणि माटुंगा यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी पीएपी फ्लॅट्स मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. वेगवेगळ्या प्रकल्पांनुसार प्रति फ्लॅट 15 ते 28 लाख रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता.
हे ही वाचा : बर्थडेचं कारण सांगून तरुणीला फ्लॅटवर बोलावलं, तरुणाने संधी साधून पीडितेशी ठेवले शरीरसंबंध
5.57 कोटी रुपयांना गंडा?
या आमिषाला बळी पडून सोनी यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून सुमारे 47 ग्राहकांकडून 5.57 कोटी रुपये गोळा केले. हे सर्व व्यवहार चेक, आरटीजीएस आणि ऑनलाइन बँकिंगद्वारे करण्यात आले होते. आरोपींनी फ्लॅटचे ताबा पत्र लवकरच मिळेल असे आश्वासन देऊन टप्प्याटप्प्याने हे पैसे उकळले. इतकेच नव्हे तर ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी एसआरएची बनावट वाटप पत्रे, जिल्हाधिकाऱ्यांची पत्रे, सोसायटीचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) आणि विजेची बिले यांसारखी सरकारी कागदपत्रेही तयार करून देण्यात आली होती.
हे ही वाचा : रॅपिडो चालकाचे अश्लील कृत्य, 'तसले' व्हिडिओ पाहताना महिला प्रवाशानं रेड हँड पकडलं
संगनमत करुन फसवणूक
2024 मध्ये जेव्हा तक्रारदाराने एसआरए कार्यालयात जाऊन या कागदपत्रांची पडताळणी केली, तेव्हा ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी शैलेश काकण, रुपेश वेलणकर, अभिषेक गुजर आणि विश्वनाथ जाधव यांच्याविरुद्ध संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जाधव यांनी एका तक्रारदाराला 25 लाख रुपयांत फ्लॅट मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. सध्या मुंबई पोलीस या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बनावट कागदपत्रे आणि आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास करत आहेत.
