मुंबईची खबर : मुंबई ठरलं विद्यार्थ्यांसाठी देशातील सर्वोत्कृष्ट शहर, जगात कितव्या स्थानी?
क्यूएस (QS) कडून 'बेस्ट स्टुडंट सिटीज'ची ताजी जागतिक क्रमवारी जाहीर झाली असून, भारतातील चार शहरांनी जगातील अव्वल 150 विद्यार्थी शहरांच्या यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : मुंबई ठरलं विद्यार्थ्यांसाठी देशातील सर्वोत्कृष्ट शहर,
जागतिक क्रमवारीत कितव्या स्थानी?
Mumbai News : क्यूएस (QS) कडून 'बेस्ट स्टुडंट सिटीज'ची ताजी जागतिक क्रमवारी जाहीर झाली असून, भारतातील चार शहरांनी जगातील अव्वल 150 विद्यार्थी शहरांच्या यादीत आपले स्थान निश्चित केले आहे. जागतिक उच्च शिक्षण विश्लेषक 'क्यूएस' (Quacquarelli Symonds) तर्फे दरवर्षी ही यादी प्रसिद्ध केली जाते. यामध्ये विद्यापीठांचे रँकिंग, एम्प्लॉयर ॲक्टिव्हिटी (रोजगार संधी), परवडणारा खर्च (अफोर्डेबिलिटी), शहराचे आकर्षण, स्टुडंट मिक्स आणि विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अशा सहा प्रमुख निकषांवर आधारित जगातील 150 शहरांचे मूल्यांकन केले जाते. यंदाच्या क्रमवारीत दिल्ली हे जगातील सर्वात परवडणारे (किफायतशीर) शहर म्हणून ठरले आहे, तर मुंबईने भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहर म्हणून आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
जागतिक क्रमवारीत कितव्या स्थानी?
भारतातील शहरांच्या कामगिरीचा विचार करता, मुंबई 91 व्या क्रमांकासह देशातील उच्च शिक्षणाचे सर्वात संतुलित केंद्र म्हणून समोर आले आहे. मुंबईला उत्तम रोजगार संधी (78.3) आणि परवडणाऱ्या खर्चाच्या (84.4) जोरावर हे यश मिळाले आहे. त्यापाठोपाठ दिल्ली जागतिक स्तरावर 99 व्या क्रमांकावर असून, रोजगार संधीच्या बाबतीत भारतीय शहरांमध्ये अव्वल (80.4) ठरले आहे. बंगळुरू 114 व्या स्थानावर असून, विद्यार्थ्यांच्या पसंती आणि समाधानाच्या बाबतीत (Students View) ते भारतात सर्वात पुढे आहे. तसेच चेन्नई 123 व्या क्रमांकावर असून शहराचे आकर्षण आणि परवडणाऱ्या खर्चाच्या जोरावर त्याने यादीत स्थान मिळवले आहे. भारतीय शहरे शिक्षण आणि रोजगारासाठी उत्तम असली, तरी जागतिक स्तरावर टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांचा अनुभव आणि शैक्षणिक दर्जात अधिक सुधारणेची गरज असल्याचे यातून स्पष्ट होते.
हे ही वाचा : 'तो' प्रश्न विचारताच आण्णा हजारे मुंबई Tak च्या मुलाखतीतून उठून गेले...
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहर कोणते?
जागतिक पातळीवर, दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल (Seoul) या शहराने उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा, रोजगाराच्या संधी आणि आकर्षण या बळावर जगातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहर म्हणून आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. जपानमधील टोकियो शहर परिपूर्ण रोजगार गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर, तर ब्रिटनची राजधानी लंडन तिसऱ्या स्थानावर आहे. लंडन हे अत्यंत महागडे शहर असले तरी शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या उत्तम अनुभवामुळे ते आघाडीवर आहे. याशिवाय पहिल्या दहा शहरांमध्ये मेलबर्न, म्युनिक, सिडनी, पॅरिस, बर्लिन, व्हिएन्ना आणि झुरिच यांचा समावेश आहे. आशियाई आणि युरोपियन शहरांनी या क्रमवारीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
हे ही वाचा : कामावर निघालेल्या महिलेवर ऑफिस कॅबमध्ये बलात्कार, 23 वर्षीय ड्रायव्हरला अटक
उत्तम पर्याय म्हणून पुढे
एकंदरीत, क्यूएसच्या या अहवालानुसार जगातील प्रमुख विद्यार्थी शहरे ही उच्च दर्जाचे शिक्षण आणि रोजगाराच्या उत्तम संधी देण्यात आघाडीवर असली, तरी वाढता खर्च आणि परवडणारी शिक्षण व्यवस्था हे जगभरातील विद्यार्थ्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. अशा परिस्थितीत भारतातील दिल्ली आणि मुंबईसारखी शहरे परवडणाऱ्या शिक्षण खर्चामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम आणि आकर्षक पर्याय म्हणून वेगाने पुढे येत आहेत.
