नंदुरबार: डोळ्यात अंजन घालणारं वास्तव! बाण, बांबू आणि ब्लेडने करतात प्रसूती… हो हे घडतंय तुमच्या-आमच्या महाराष्ट्रात!
नंदुबारमधील अनेक आदिवासी आणि अतिदुर्गम भागात बाण,बांबू आणि ब्लेडने महिलांची प्रसूती केली जात असल्याचं समोर आलंय. वाचा मुंबई Tak चा विशेष रिपोर्ट.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आदिवासी अतिदुर्गम भागात बाण,बांबू आणि ब्लेडने केली जाते प्रसुती
पुरुषदाई करतात गरोदर महिलांची प्रसुती
नंदुरबारच्या धडगाव, अक्कलकुवा भागातील धक्कादायक प्रकार
नंदुरबारः राज्यातील गरोदर माता, अर्भक व नवजात बालकांच्या मृत्यूचा दर कमी व्हावा म्हणून शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र, दुर्गम भागांमध्ये आजही शासनाच्या योजना पोहोचल्या नसल्याचे भीषण वास्तव नंदुरबार मधून समोर आले आहे. नंदुरबारच्या धडगाव, अक्कलकुवा यांसारख्या दुर्गम भागांमध्ये आजही बाण, बांबू आणि ब्लेडच्या सहाय्याने महिलांची प्रसूती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर हे घडतंय महाराष्ट्रात, या घटनेने तुमच्याही अंगावर येईल काटा
देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. या जवळपास 75 वर्षांच्या स्वतंत्र भारताने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली. यामध्ये शासनाने देखील विविध कल्याणकारी योजना राबवत यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला मात्र, नंदुरबारसारख्या अतिदुर्गम भागात आजही शासनाच्या योजना पोहोचल्या नसल्याच वारंवार अधोरेखित होत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
नंदुरबारच्या अक्कलकुवा, धडगाव या भागामध्ये आजही पुरुष दाईंकडून महिलांची प्रसूती केली जाते. यातील धक्कादायक बाब म्हणजे बाण, बांबू आणि शेविंग ब्लेड यांसारख्या वस्तूंचा प्रसूतीसाठी केला जातोय. आणि त्याची कोणत्याही प्रकारच्या शासकीय कागदावर नोंद केली जात नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे आरोग्य विभाग आपल्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंद सक्षमपणे आणि नियमितपणे करत असल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून करण्यात आला असून चालत आलेल्या जुन्या चालीरीतींमुळे काही ठिकाणी पुरुष दायांच्या मदतीने प्रसूती केली जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.










