नाशिककरांनो तुम्हाला माहितीए का तुमच्या महापालिकेनं नेमकं काय केलंय? झालंय भन्नाट काम!
नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भांडवली बाजारातील 'बॉण्ड'च्या माध्यमातून शहरांच्या विकासाला निधीचे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महानगरपालिकांना आपल्या विविध विकास कामांसाठी भांडवली बाजारात बॉण्ड जारी करून निधी उभारता येतो. नाशिक महापालिकेप्रमाणे 'इनोव्हेटिव्ह फंड' निर्माण करून विकासाला निश्चितच निधीचे बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 'रिंगिंग बेल' वाजवून करण्यात आले.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, नाशिकच्या महापौर श्रीमती हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिद्र सानप, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, नाशिक कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री, आदी उपस्थित होते.
पाहा मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले...
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'नाशिक महानगरपालिकेने एकाच आर्थिक वर्षात प्रथम खाजगी प्लेसमेंट आणि आता सार्वजनिकरित्या असे दोन्ही म्युनिसिपल बॉण्ड जारी करून या महापालिकेने भांडवली बाजारात प्रवेश केला आहे. भांडवली बाजाराच्या माध्यमातून महापालिकांनी निधी उभा करून लोकोपयोगी कामे केली पाहिजेत. यासाठी केंद्र शासनाने योजनादेखील घोषित केली आहे. पहिल्या टप्प्यात २०० कोटी रुपयांपर्यंतचे बॉण्ड्स काढण्याकरिता केंद्राने मान्यता दिली होती. याचे यश बघता केंद्रीय अर्थसंकल्पात या बॉण्डची मर्यादा १ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.'









