नाशकात झाडांच्या छाटणीसाठी कटर आणला पण डिझेलचा भडका, एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू
Nashik News : नाशकात झाडांच्या छाटणीसाठी कटर आणला पण डिझेलचा भडका, एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

झाडांच्या छाटणीसाठी कटर आणला पण डिझेलचा भडका उडाला

नाशकातील एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू
नाशिक : सातपूरच्या महादेववाडी भागात मागील आठवड्यात बुधवारी (दि. ८) मनपा ठेकेदाराच्या कामगारांकडून झाडांची छाटणी सुरू होती. या कामात कटरसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलसदृश ज्वलनशील पदार्थाच्या अचानक भडक्यामुळे सहा जण गंभीर जखमी झाले. या घटनेत प्रकृती गंभीर असलेल्या चौघांना मुंबईतील रुग्णालयात हलवले गेले होते, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांसह त्यांच्या शेजारी राहणारी एक महिला देखील समाविष्ट आहे.
वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे घटना घडल्याची चर्चा
मुंबईच्या केईएम रुग्णालयात रविवारी रात्री कैलास छगन दोबाडे ( वय 57), त्यांचा मुलगा पंकज (33) व सून दुर्गा आकाश दोबाडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच सोमवारी (दि. 13) त्यांच्या शेजारी राहणारी सोनाली राजेंद्र गाडेकर (35) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्घटना मनपा ठेकेदार आणि अज्ञात वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. सातपूरमधील महादेववाडी, खोका मार्केटसह परिसरात या घटनेनं शोककळा पसरली आहे. पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे.
एकाच कुटुंबातील तिघांनी गमावला जीव
एकाच कुटुंबातील तिघांनी तिघांनी जीव गमावल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उर्वरीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. हातमजुरी करणाऱ्या या कुटुंबाने दिवाळीच्या तोंडावर कुटुंबप्रमुख, मुलगा आणि सून गमावले आहेत. त्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे आणि परिवाराचे दुःख सामोरे जाणे त्यांच्या नातेवाईकांसाठी अत्यंत कठीण झाले आहे.
महापालिकेकडून पाच लाखांची मदत
महापालिकेच्या उद्यान विभागाने मृतकांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांची, तर जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या आदेशांची घोषणा मनपा आयुक्त मनीषा खत्री व अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी केली. उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी संबंधित प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे पाठवला होता आणि त्याची तातडीने दखल घेण्यात आली. या भडक्यात दुर्गा दोबाडे यांचा मृत्यू झाल्याने दीड वर्षाच्या भावेश या चिमुकल्याने आई, आजोबा आणि चुलता गमावले आहेत. सध्या हा लहानगाच मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहे आणि मृत्यूशी झुंज देत आहे.