परभणी : कर्जाचा डोंगर, दुष्काळाचा फटका, कुटुंब रस्त्यावर आलं, मिरखेल गावात काय घडलं?
परभणी जिल्ह्यातील दुष्काळाची झळ आता शेतकरी कुटुंबांच्या जगण्यावरही दिसू लागली आहे. मिरखेल गावात दुष्काळ, शेतीचं नुकसान आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे एका कुटुंबासमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
परभणीतील मिरखेल गावात काय घडलं?
Parbhani Farmer Suicide : परभणी जिल्ह्यातील मिरखेल येथे दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी मुकुंद इंगळे यांनी आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अवघ्या दीड एकर शेतीवर अवलंबून असलेल्या मुकुंद यांच्यावर बँकेचे 20 ते 22 हजारांचे आणि सावकाराचे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे कर्ज होते. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे शेतातील सोयाबीनचे पीक वाळून गेले होते. पिकातून काहीही उत्पन्न हाती येण्याची शक्यता उरली नव्हती. वाढता कर्जबाजारीपणा, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता आणि सततची नापिकी यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला रुमालाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
नेमकं काय घडलं?
मुकुंद इंगळे हे कुटुंबातील एकमेव कर्ते पुरुष होते. त्यांनी कधीही आपल्या कर्जाचा वा अडचणींचा भार कुटुंबावर पडू दिला नव्हता. आत्महत्येच्या आदल्या दिवशीपर्यंत त्यांनी पुण्याला कामाला असलेल्या मुलाशी व कुटुंबीयांशी नेहमीप्रमाणे संवाद साधला होता, मात्र मनातील वेदना कोणाजवळही व्यक्त केल्या नाहीत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला आणि भरपाईच्या घोषणा केल्या असल्या, तरी कुटुंबातील कर्ता पुरुष निघून गेल्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे, अशी आर्त हाक त्यांच्या अश्रू अनावर झालेल्या कुटुंबीयांनी दिली आहे.
हे ही वाचा : बंटी पाटलांना कोंडीत पकडण्याचा फडणवीसांचा प्लॅन? पुणे पदवीधर निवडणुकीत स्मिता जाधवांच्या एन्ट्रीची इनसाईड स्टोरी!
लोकप्रतिमनिधी कुठे आहेत?
घटनेला 8 ते 10 दिवस उलटूनही प्रशासकीय आणि राजकीय स्तरावरून दाखवण्यात आलेली उदासीनता ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण करत आहे. परभणी शहरापासून अवघ्या 10 ते 15 किलोमीटर अंतरावर हे गाव असतानाही अद्याप स्थानिक आमदार राहुल पाटील, खासदार बंडू जाधव, पालकमंत्री किंवा अन्य कोणताही लोकप्रतिनिधी बाधित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पोहोचलेला नाही. केवळ स्थानिक तहसीलदारांनी भेट देऊन पंचनाम्याचे आणि कागदपत्रांनंतर भरपाई देण्याचे औपचारिक आश्वासन दिले आहे. सलग तीन वर्षे पडणारा दुष्काळ आणि नापिकीमुळे मिरखेल आणि पिंगळी मंडळातील शेतकरी पूर्णपणे कोलमडला असून लोकप्रतिनिधींच्या या संवेदनाहीन भूमिकेमुळे गावकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील वातावरण फिरलं, 'हे' जिल्हे तापमानाने उकडणार
आश्वासनांची नव्हे, ठोस आधाराची गरज
शासकीय मदतीचे जीआर आणि कागदी घोषणा प्रत्यक्ष बांधावर पोहोचण्यापूर्वीच शेतकऱ्यांचा बळी जात असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. दीड एकर शेतीपैकी काही भाग आधीच व्याजापोटी गमवावा लागलेल्या मुकुंद यांच्या शेतात आज वाळलेले सोयाबीन आहे. दुष्काळ, सावकारी पाश आणि बँकांच्या वसुलीच्या चक्रात अडकलेल्या बळीराजाला केवळ आश्वासनांची नव्हे, तर तात्काळ आणि ठोस आधाराची गरज आहे. सरकार आणि प्रशासन या उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला नेमका काय दिलासा देणार आणि भविष्यात अशा आत्महत्या रोखण्यासाठी काय पावले उचलणार, हा गंभीर प्रश्न या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
