परभणी : संविधान विटंबना प्रकरणातील प्रमुख आरोपीने आयुष्य संपवलं, जामीनावर सुटताच टोकाचं पाऊल
Parbhani Crime News : गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता पवार हे गावात एकटेच राहत होते. त्यांचे कुटुंबीय पुणे येथे वास्तव्यास असल्याचं सांगण्यात येत आहे. घरात कोणीही नसल्याने ते मानसिक तणावाखाली असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. आज पहाटेच्या सुमारास त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
परभणी : संविधान विटंबना प्रकरणातील प्रमुख आरोपीने आयुष्य संपवलं
जामीनावर सुटताच टोकाचं पाऊल
Parbhani Crime News : परभणी शहराला काही महिन्यांपूर्वी हादरवून सोडणाऱ्या संविधान विटंबना प्रकरणातील प्रमुख आरोपी दत्ता सोपान पवार (वय 45) याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जामीनावर सुटून घरी परतल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास परभणी पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता सोपान पवार यांनी काही महिन्यांपूर्वी परभणी रेल्वे स्थानकासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या भारतीय संविधानाची विटंबना केली होती. या घटनेनंतर परभणी शहरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. विविध संघटना, नागरिक आणि आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. काही ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आणि मोठ्या प्रमाणावर दंगलसदृश स्थितीही पाहायला मिळाली होती. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दत्ता पवार यांना अटक केली होती. संविधानाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या गावी आणून सोडलं होतं.
गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता पवार हे गावात एकटेच राहत होते. त्यांचे कुटुंबीय पुणे येथे वास्तव्यास असल्याचं सांगण्यात येत आहे. घरात कोणीही नसल्याने ते मानसिक तणावाखाली असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. आज पहाटेच्या सुमारास त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सकाळी सुमारे नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शेजाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी घराकडे पाहिलं असता दत्ता पवार यांनी गळफास घेतल्याचं दिसून आलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा संविधान विटंबना प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. आत्महत्येमागचं नेमकं कारण काय? याबाबत पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी आढळून आली आहे का, याचाही तपास सुरू आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पुढील चौकशीनंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.










