पुण्यात कोट्यवधींच्या जमिनीवर 40-50 जणांचा कब्जा? खर्डे पाटील पिता-पुत्रांवर गुन्हा
पुण्यातील म्हाळुंगे गावात कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, खर्डे पाटील पिता-पुत्रांसह ४० ते ५० अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

पुणे: हिंजवडीच्या आयटी हबजवळील म्हाळुंगे गावात कोट्यवधी रुपये किमतीच्या मोक्याच्या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अरुण खर्डे पाटील, प्रसाद खर्डे पाटील यांच्यासह तब्बल ४० ते ५० अनोळखी व्यक्तींविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी सहा वाजता हा प्रकार घडला.
नेमकं प्रकरण काय?
म्हाळुंगे येथील सर्व्हे क्रमांक ९/१० मधील तब्बल १२६ आर जमीन बांधकाम व्यावसायिक अभि विजय रौंदळ यांनी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत लिलावातून खरेदी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ३१ मार्च २०२४ रोजी बँकेकडून या जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर जुन्या सात मजली इमारतीचे कायदेशीररीत्या पाडकाम करण्यात आले. त्यानंतर सरकारी मोजणीही करण्यात आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. याच जमिनीतून पुणे मेट्रो लाईन-३ जात असल्याने त्याबदल्यात सरकारी मोबदला मिळाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
हे ही वाचा>> पुणे हादरलं, पाकिस्तानी ब्यूटी क्रीम चक्क पुणेकरांच्या हाती आली अन्...
अचानक ४०-५० जणांचा जमाव?
फिर्यादीच्या आरोपानुसार, २७ जुलैच्या सकाळी अरुण खर्डे पाटील आणि प्रसाद खर्डे पाटील यांनी ४० ते ५० जणांना सोबत घेऊन जमिनीवर प्रवेश केला. या जमावाकडे जेसीबी, क्रेन आणि इतर वाहने असल्याचा आरोप आहे. जमिनीवरील सुरक्षेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा यंत्रणा तोडून नष्ट करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हे ही वाचा>> पुण्यातील विश्रांतवाडीत 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 52 वर्षीय सफाई कंत्राटी कामगाराला अटक
त्यानंतर जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने जमिनीच्या पूर्व बाजूची सिमेंट-विटांची भिंत आणि पत्र्याचे कंपाउंड पाडण्यात आल्याचा आरोप आहे.
सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याचा आरोप जमिनीवरील सुरक्षारक्षकांनी या प्रकाराला विरोध करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षक नितीन वसंत सोनवणे, धनाजी मारुती गाडेकर आणि शुभम विजय सोनवणे यांनी विरोध केला असता त्यांना शिवीगाळ, दमदाटी आणि हाताने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच भिंतीवरील 'तीर्थ' नावाचा बोर्ड फोडून नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
