मिरज शासकीय रुग्णालय दुर्घटना : दोन कोटींची कमान कशी कोसळली?

मुंबई तक

sangli miraj hospital slab collapse : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रवेशकमानीचा स्लॅब कोसळून सात कामगार जखमी झाले. जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात आले.

ADVERTISEMENT

sangli miraj hospital slab collapse
sangli miraj hospital slab collapse
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मिरज शासकीय रुग्णालय दुर्घटना

point

दोन कोटींची कमान कशी कोसळली?

sangli miraj hospital slab collapse : सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेल्या कमानीचा स्लॅब अचानक कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सात कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आणि जखमी झाले. कमानीचे बांधकाम सुरू असतानाच स्लॅबचा वरचा भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सातही कामगारांना बाहेर काढण्यात आले. जखमी कामगारांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला

मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात विविध नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. याच कामांतर्गत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नवीन स्वागत कमान उभारण्यात येत होती. बांधकाम सुरू असताना अचानक कमानीचा वरचा स्लॅब कोसळला. त्यामुळे काम करणारे सात कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अपघाताची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य करून सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची माहिती घेतली.

वापरण्यात आलेले सिमेंट आणि स्टील निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप

प्राथमिक माहितीनुसार स्लॅब कोसळल्यामुळे सात जण जखमी झाले असून सर्वांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमी स्थिर असून त्यापैकी कोणीही धोक्याच्या स्थितीत नसल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या नूतनीकरणाच्या कामाच्या दर्जावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. वापरण्यात आलेले सिमेंट आणि स्टील निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप आमदार इद्रिस नायकवडी आणि सामाजिक कार्यकर्ते महेश कांबळे यांनी केला आहे. बांधकामाची पद्धत आणि वापरण्यात आलेल्या साहित्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या घटनेप्रकरणी कंत्राटदारावर निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई गांधी चौक पोलिस ठाण्यामार्फत करण्यात येणार आहे. दरम्यान, जखमी कामगारांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी आणि उपचार सुरू असेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांचा खर्च शासनाने उचलावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश कांबळे यांनी केली आहे. तसेच या संपूर्ण नूतनीकरणाच्या कामाची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.