उतार वयात जुळलेल्या अनैतिक संबंधातून मर्डर, DNA टेस्ट अन् दीड महिन्यांनी उलगडा!

मुंबई तक

Pandharpur Crime News : पंढरपुरात 70 वर्षीय महिलेने वादानंतर तिच्या 70 वर्षीय प्रेमीची हत्या केल्याचा आरोप आहे. अर्धवट जळालेल्या मृतदेहाची डीएनए तपासणीतून ओळख पटल्यानंतर दीड महिन्याने या घटनेचा उलगडा झाला.

ADVERTISEMENT

Pandharpur Crime News
Pandharpur Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

उतार वयात जुळलेल्या अनैतिक संबंधातून मर्डर

point

DNA टेस्ट अन् दीड महिन्यांनी उलगडा!

Pandharpur Crime News : पंढरपुरात वाढत्या वयात जुळलेल्या प्रेमसंबंधाचा धक्कादायक शेवट झाल्याची घटना समोर आली आहे. 70 वर्षीय मंगल होनमाने या महिलेने वादानंतर तिचा प्रेमी अंबादास खांडेकर यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अंबादास खांडेकर यांचे वयही 70 वर्षे होते. विशेष म्हणजे, या घटनेचा उलगडा तब्बल दीड महिन्यानंतर झाला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी करण्यात आलेल्या डीएनए तपासणीनंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आणि मंगल होनमाने यांना ताब्यात घेतले.

शेतात अंबादास खांडेकर यांची हत्या केल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, 27 जुलै रोजी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत जाऊन हिंसाचारापर्यंत पोहोचला. यावेळी मंगल होनमाने यांनी शेतात अंबादास खांडेकर यांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मृतदेह जाळल्यानंतर मंगल होनमाने तेथून निघून गेल्या.

ग्रामस्थांना शेतात अधजळालेला मृतदेह आढळून आला

या घटनेनंतर 2 ऑगस्ट रोजी काही ग्रामस्थांना शेतात अधजळालेला मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान होते. त्यामुळे फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले आणि मृतदेहाचे नमुने डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याचदरम्यान अंबादास खांडेकर बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अंबादास यांच्या दोन मुलींचे डीएनए नमुने घेतले आणि ते तपासणीसाठी पाठवले.

डीएनए अहवाल आल्यानंतर अधजळालेला मृतदेह अंबादास खांडेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. अंबादास आणि त्यांच्या दोन मुलींच्या डीएनए नमुन्यांचा मेळ झाला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला. दीड महिन्याच्या तपासानंतर पोलिसांनी कारवाईला वेग दिला आणि अवघ्या 12 तासांत मंगल होनमाने यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहेत. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर परिसरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.