नवरा पहिल्या बायकोला भेटू लागला, दुसऱ्या बायकोने प्रियकराची मदत घेतली अन्...
लखनऊ मधील एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या नवऱ्याची हत्या केली. याप्रकरणी आरोपी महिला, प्रियकर आणि तिच्या 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवरा पहिल्या बायकोला भेटू लागला
दुसऱ्या बायकोने प्रियकराच्या मदतीने सगळंच संपवलं
Crime News : लखनऊमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीचे त्याच्या पहिल्या पत्नीशी असलेले संबंध आणि तिला करत असलेली आर्थिक मदत यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असत, ज्यातून या हत्येचा कट रचण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली असून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत करणाऱ्या तिच्या 16 वर्षीय मुलालाही ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी कालव्याजवळ एका पेटीत मृतदेह आढळून आल्यानंतर या गुन्ह्याला वाचा फुटली.
नेमका वाद काय होता?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुफिया बानो आणि रामकिशोर वाल्मिकी यांचे चार वर्षे प्रेमसंबंध होते आणि दोन वर्षांपूर्वी त्यांनी लग्न केले होते. मात्र, सुफियाचे मुन्ना ऊर्फ मुच्छड (52) नावाच्या व्यक्तीसोबतही अनैतिक संबंध होते आणि याची माहिती रामकिशोरला मिळाली होती. यावरून त्यांच्यात खटके उडत असतानाच, रामकिशोरने आपली पहिली पत्नी कविता देवी हिच्याकडे पुन्हा जाण्यास आणि तिला आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. यामुळे चिडलेल्या सुफियाने मुन्ना आणि त्याचा साथीदार मोहम्मद इक्बाल ऊर्फ बशीर अहमद (40) याच्यासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला.
हे ही वाचा : तरुणाचा मेहुणीवर जीव, प्रेयसीला संपवलं अन् 10 किमी अंतरावर फेकला मृतदेह
मध्यरात्री काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 आणि 15 सप्टेंबरच्या मध्यरात्री सुफियाने या दोन्ही आरोपींना घरी बोलावले आणि घराचा दरवाजा उघडा ठेवला. रामकिशोर गाढ झोपेत असताना आरोपींनी घरात घुसून त्याच्यावर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर रक्ताने माखलेला फरशीचा भाग प्लास्टर करून पुसून काढला, तसेच रक्ताने माखलेला झाडू, मृताचे कपडे आणि हत्येसाठी वापरलेला चाकू लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नंतर सुफियाने आपल्या मुलाला बोलावून घेतले आणि सर्वांनी मिळून मृतदेह पलंगाखालील एका लाकडी पेटीत लपवला. काही वेळाने हा मृतदेह एका ई-रिक्षात टाकून कालव्याच्या पुलाखाली नेऊन फेकून देण्यात आला.
हे ही वाचा : शेजाऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध, शेवटी नदीकाठी सडलेला मृतदेह सापडला
180 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
याप्रकरणी रामकिशोरची पहिली पत्नी कविता देवी हिच्या तक्रारीवरून 17 सप्टेंबर रोजी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 (हत्या) आणि इतर कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला. डीसीपी मुश्ताक यांनी सांगितले की, तपासासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली होती. त्यांनी ई-रिक्षाच्या संशयित मार्गावरील सुमारे 170 ते 180 सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक तसेच गुप्तचरांच्या मदतीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली ई-रिक्षाही जप्त केली आहे.
