ठाणे : चुकीच्या दिशेने आले, अडवल्यानंतर ट्रॅफिक पोलिसाला कपडे फाटेपर्यंत मारहाण, हल्लेखोर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते?
Thane Crime News : विशेष म्हणजे हल्लेखोर हे वाहतूक नियमाचे उल्लंघन करून वाहतूक कोंडीत विरुद्ध दिशेने कार नेत होते. त्यामुळे ट्रॅफिक पोलीस विलास भागीत यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच गोष्टीचा राग येऊन तीन हल्लेखोरांनी भर चौकात वर्दी फाटेपर्यंत बेदम मारहाण केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ठाणे : चुकीच्या दिशेने आले
अडवल्यानंतर ट्रॅफिक पोलिसाला कपडे फाटेपर्यंत मारहाण
कल्याणमध्ये काय घडलं?
Thane Crime News, कल्याण : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तिघांनी ट्रॅफिक पोलिसाला वर्दी फाटेपर्यंत बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील दुर्गाडी चौकात घडली आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोर फरार झाले असून पोलिसांनी हल्लेखोर त्रिकुटाचा शोध घेण्यासाठी तपास सुरु केला आहे. विलास सुरेश भागीत,( वय 33 ) असे जखमी वाहतूक पोलिसांचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तीन हल्लेखोरांविरोधात BNS कलम 121(1),132,125,28,352,3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हल्लेखोर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याने पोलिसांवर दबाव?
विशेष म्हणजे हल्लेखोर हे वाहतूक नियमाचे उल्लंघन करून वाहतूक कोंडीत विरुद्ध दिशेने कार नेत होते. त्यामुळे ट्रॅफिक पोलीस विलास भागीत यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच गोष्टीचा राग येऊन त्या हल्लेखोरांनी भर चौकात वर्दी फाटेपर्यंत बेदम मारहाण केली आहे. तर दुसरीकडे भर चौकात पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून गुन्हेगारांना वर्दीचा धाक नसल्याचे दिसून आले आहे. संबंधित हल्लेखोर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून या तिघांच्या अटकेवरून पोलिसांवर दबाव असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात चाललंय तरी काय? साताऱ्यातील दुर्गम भागात DRI ची धाड, 55 कोटींचं ड्रग्ज अन् कच्चा माल जप्त
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास सुरेश भागीत हे सहा महिन्यापासून शहर वाहतुक शाखा कल्याण येथे कार्यरत आहेत. ते 24 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी दुर्गाडी चौक, कल्याण पश्चिम येथे वाहतूक नियमनासाठी पोलीस हवालदार पी. पी. गायकवाड आणि ट्राफिक वार्डन प्रतिक पवार यांचेसोबत कर्तव्यावर होतो. याच वेळी रात्रीच्या 10 वाजता कोनगाव कडून येणा-या लाईनवर ट्राफिक जाम झाले होते. त्यामुळे विलास भागीत हे दुर्गाडी चौक जाम झाल्याने कोनगाव कडून येणारी लाईन थांबवत होते. मात्र, याचवेळी टॅलिक सिल्व्हर गोल्ड रंगाची कार (इनोव्हा, एम एच 05 सीए 0400) दुर्गाडी चौकाकडून विरूद्ध दिशेने येत होती. आधीच वाहतूक कोंडी चौकात झाल्याने सदर कार थांबवून विरूद्ध दिशेने जाण्यास ट्रॅफिक पोलीस असलेल्या भागीत यांनी मनाई केली. याच गोष्टीचा राग येऊन कार चालकाने (वय अंदाजे 25 ते 30) खाली उतरून शिवीगाळ केली. तसेच आम्हाला का अडवतोस? असं म्हणत ट्रॅफिक पोलिसाला मारहाण केली. यावेळी ट्रॅफिक पोलिसाला तिघांकडून वर्दी फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. सध्या कल्याणच्या फोर्टीस हॉस्पीटलमध्ये भागीत यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती वारिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर सिंग गौड यांनी दिली आहे.










