मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी! नागरिकांची तारांबळ, थंडी कधी येणार?
शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सकाळी मुंबईतील काही भागांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई पावसाच्या सरी
नागरिकांची उडाली तारांबळ
थंडीची वाट पहावी लागणार
Mumbai Rains : शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सकाळी मुंबईतील काही भागांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दादर, माटुंगा यांसारख्या मध्य मुंबईतील परिसरांसह गोरेगावसारख्या पश्चिम उपनगरांमध्येही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दादर रेल्वे स्थानक आणि माटुंग्याच्या निवासी भागात पावसाचे दृश्य पाहायला मिळाले. अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असली, तरी वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला होता.
एकीकडे पाऊस, तर दुसरीकडे प्रदूषण
एकीकडे पावसाच्या सरी कोसळत असताना दुसरीकडे मात्र शहरावर धुक्याची आणि प्रदूषणाची जाड चादर पसरलेली दिसून आली. वडाळा आणि दक्षिण मुंबईतील अनेक भागांमध्ये कमी दृश्यमानतेमुळे धुक्याचे साम्राज्य पसरले होते. पावसाच्या आगमनानंतरही हवेतील प्रदूषणाची पातळी कायम राहिल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या चिंता अधिक वाढल्या आहेत. शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 163 नोंदवला गेला असून, हवा अजूनही 'वाईट' श्रेणीतच आहे.
हे ही वाचा : कराळे मास्तर, रविराज साबळेंनी प्रस्थापितांची गणितं कशी बिघडवली?
दमट वातावणाचा सामना
शुक्रवारी सकाळी मुंबईचे किमान तापमान 28 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत दिवसाचे तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी हवेतील दमटपणा (ह्युमिडिटी) तसाच कायम राहणार आहे. त्यामुळे पावसाच्या सरींनंतरही मुंबईकरांना दमट वातावरणाचा सामना करावा लागणार आहे.
हे ही वाचा : अर्णब चक्रीवादळानंतर नवी प्रणाली सक्रिय, राज्यात कुठे पावसाचा इशारा?
थंडीची वाट पहावी लागणार
दरम्यान, मुंबईत गेल्या काही आठवड्यांपासून उष्ण आणि दमट हवामान आहे. मुंबईकरांना गुलाबी थंडीची वाट पाहावी लागत असून, हवामान खात्यानुसार (IMD) डिसेंबर महिन्यापासूनच तापमानात मोठा बदल होऊन हिवाळ्याची चाहूल लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मुंबईकरांना अवकाळी पाऊस, उकाडा आणि वाढत्या प्रदूषणाचा सामना करतच दिवस काढावे लागणार आहेत.
