Govt Jobs : वसई-विरार महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, काय आहेत पात्रतेचे निकष?
वसई-विरार महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर आहे. या पदांसाठी पात्रतेचे निकष काय? पगार किती मिळणार? जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वसई-विरार महानगरपालिकेत भरती
काय आहेत पात्रतेचे निकष?
पगार किती मिळणार?
Vasai Virar Municipal Corporation Recruitment : वसई-विरार महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेकडून विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीअंतर्गत एकूण 156 पदे भरली जाणार असून, यामध्ये कनिष्ठ अभियंता, उद्यान निरीक्षक, सहाय्यक रसायनतंत्रज्ञ, आरेखक, सर्व्हेअर, वीजतंत्री, आरोग्य निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, लिपिक टंकलेखक, सहाय्यक विधी अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि अग्निशमन विभागातील पदांचा समावेश आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीमध्ये सर्वाधिक 50 जागा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि 50 जागा लिपिक टंकलेखक या पदांसाठी आहेत. याशिवाय कनिष्ठ अभियंता (विद्युत) 7, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 2, उद्यान निरीक्षक 3, सहाय्यक रसायनतंत्रज्ञ 2, आरेखक 4, सर्व्हेअर 4, विजतंत्री 10, आरोग्य निरीक्षक 1, सहाय्यक ग्रंथपाल 1, सहाय्यक विधी अधिकारी 1, सांख्यिकी अधिकारी 1, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1, गाळणी निरीक्षक 3, अग्निशमन केंद्र अधिकारी 2, उप-अग्निशमन केंद्र अधिकारी 4 आणि प्रमुख अग्निशमन विमोचक या पदाच्या 10 जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून, दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभवही आवश्यक आहे. तसेच टंकलेखक आणि सर्व्हेअर पदांसाठी मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
हे ही वाचा : 'शरद पवारांसाठी राज्यसभेची जागा सोडली, आता त्यांचा पक्ष भाजपला पाठिंबा देणार..' महाराष्ट्र काँग्रेसची पोस्ट तुफान व्हायरल
पगार किती मिळणार?
वयोमर्यादेचा विचार करता, 1 नोव्हेंबर 2026 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे. अग्निशमन केंद्र अधिकारी पदासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे, उप-अग्निशमन केंद्र अधिकारी पदासाठी 35 वर्षे, तर प्रमुख अग्निशमन विमोचक पदासाठी 30 वर्षे आहे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार वेतनश्रेणी मिळणार असून, काही पदांसाठी 19,900 रुपयांपासून ते 1,32,300 रुपयांपर्यंत वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये, तर मागासवर्गीय, अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 900 रुपये आहे. माजी सैनिकांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
हे ही वाचा : लॉजमध्ये तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ, प्रियकराला 'तो' संशय; नेमकं काय घडलं?
अर्ज कसा कराल?
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकृत भरती जाहिरातीत (vvcmc.in) दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2026 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पदनिहाय शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासून घ्याव्यात. अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
