अवघ्या 10 दिवसांवर लग्न.. पत्रिका वाटायला निघालेल्या नवरदेवाचा एका क्षणात मृत्यू!
नंदूरबारमध्ये एक अत्यंत भीषण असा अपघात झाला. ज्यामध्ये दुचाकीवरील दोघा तरुणांचा मृत्यू झाला आहे. लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघालेले असतानाच या दोन्ही तरुणांनी अपघातात आपला जीव गमवावा लागला.
ADVERTISEMENT

नंदूरबार: नंदूरबार जिल्ह्यातील धानोरा-नंदुरबार मार्गावर गुरुवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हळहळला. लोय फाटा ते वेळावद फाटा दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास भरधाव चारचाकीने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाला रस्त्यावरच आग लावली.
स्वत:च्या लग्नाच्या पत्रिका वाटायला निघाला अन् अपघातात तरुणाने गमावला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर येथील जमील पठाण याच्या ताब्यातील महिंद्रा झायलो (GJ-16-BB-1552)ही चारचाकी गाडी भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकल (GJ-05-BR-0452)ला जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर धानोरा परिसरातील नागरिक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान रोहित आप्पा भिल (वय 22, रा. शिंदे, ता. नंदूरबार) आणि साजन संजय भिल (वय 18,रा.. करजई, पोस्ट डामरखेडा, ता. शहादा) यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा>> भंडारा : भाचाला लग्नात आशीर्वाद दिले अन् परतताना व्हॅनचा चक्काचूर, भीषण अपघातात मामा-मामीसह 5 जणांचा करुण अंत
या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे मृत रोहित भिल याचा अवघ्या दहा दिवसांवर विवाह ठरला होता. तो आपल्या मित्रासोबत नातेवाईकांकडे लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघाला होता. घरात लग्नाची लगबग सुरू असताना अचानक आलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.









