अकोला : भोंदूबाबाचा चिमुकल्यांसोबत अघोरी प्रकार, दातांनी पकडून फिरवायचा, खिळ्यांच्या पाटावर...
Gulal Shesh Baba : अकोला जिल्ह्यातील निंभा गावात 'गुलाल शेष बाबा' नावाच्या भोंदू बाबाने चिमुरड्यांवर अघोरी प्रथा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, सोशल मीडियावरील व्हायरल रीलमुळे पोलिसांनी कारवाई केली आहे. या बाबावर जादूटोणा विरोधी कायदा आणि बाल न्याय अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अकोला : भोंदूबाबाचा चिमुकल्यांसोबत अघोरी प्रकार,
दातांनी पकडून फिरवायचा, खिळ्यांच्या पाटावर...
Gulal Shesh Baba, धनंजय साबळे : महाराष्ट्र जरी स्वतःला पुरोगामी मानत असला, तरी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यातील निंभा गावातून अंधश्रद्धेचा एक अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. चेतन सुनील मुळे (24) उर्फ 'गुलाल शेष बाबा' नावाच्या एका भोंदू बाबाने दैवी शक्तीच्या नावाखाली लहान मुलांच्या जीविताशी खेळ मांडला होता. सोशल मीडियावर या बाबाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यामध्ये तो चिमुरड्यांना त्यांच्या कपड्यांना धरून हवेत गोल गोल फिरवताना आणि खिळ्यांच्या पाटावर बसून अघोरी कृत्य करताना दिसत आहे. या धक्कादायक प्रकाराची दखल घेत बाल कल्याण समितीच्या सदस्य प्रांजली जैस्वाल यांनी तक्रार दाखल केली, ज्यावरून मूर्तिजापुर ग्रामीण पोलिसांनी या भोंदू बाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुत्र प्राप्तीचा दावा आणि 'चमत्कार' दाखवण्याचे जीवघेणे खेळ
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा कथित बाबा अमानवीय कृत्य करताना स्पष्टपणे दिसत आहे. तो खिळ्यांनी भरलेल्या लाकडी पाटावर बसून लिंबाच्या साहाय्याने अंधश्रद्धा पसरवणारे प्रयोग करतो. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, दर सोमवारी रात्री आणि विशेषतः नागपंचमीच्या दिवशी येथे मोठा दरबार भरवला जातो. ज्या दाम्पत्यांना अपत्य होत नाही, त्यांच्या इच्छा येथे पूर्ण होतात, असा खोटा दावा केला जातो. त्यानंतर ही हतबल लोक आपल्या लहान मुलांना या बाबाच्या दरबारात घेऊन येतात, जिथे मुलांच्या कपड्यांना पकडून त्यांना हवेत फिरवण्याचे जीवघेणे 'रुढी' पार पाडल्या जातात. या कृत्यांना 'चमत्कार' असे नाव देऊन लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवली जाते आणि त्यामाध्यमातून आर्थिक लूट केली जाते.
हेही वाचा : गायकवाडांनी धमक्या दिल्या, अंबींची पोलीस ठाण्यात धाव, सरोदेंमार्फत दाखल केलेली तक्रार जशीच्या तशी
ग्रामस्थांचा भोंदूगिरीला विरोध आणि अंनिसची कडक कारवाईची मागणी
निंभा गावात जेव्हा परिस्थितीची पाहणी करण्यात आली, तेव्हा अनेक ग्रामस्थांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील एकही व्यक्ती या दरबारात जात नाही, तर बाहेरच्या जिल्ह्यातील लोक येथे फसवले जातात. एका सुज्ञ ग्रामस्थाने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, "जर खरोखर दैवी शक्ती असती, तर ती महापुरुषांमध्ये दिसली असती, अशा भोंदू बाबांमध्ये नाही." दर सोमवारी डीजे आणि लाउडस्पीकरच्या आवाजामुळे ग्रामस्थांची शांतता भंग होत असून मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शरद वानखडे यांनी या अघोरी प्रथांविरुद्ध प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.









