चिमुरडीवर 39 मिनिटे अत्याचार, 18 जखमा; नसरापूर बलात्कार प्रकरणात कोर्टात काय घडलं?

मुंबई तक

नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे, आरोपी भिमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. कोर्टात नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Nasrapur Case Verdict
Nasrapur Case Verdict
google news

बातम्या हायलाइट

point

चिमुरडीवर 39 मिनिटे अत्याचार, 18 जखमा

point

नसरापूर बलात्कार प्रकरणात कोर्टात काय घडलं?

Nasrapur Case Verdict : पुण्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेला बलात्कार आणि तिच्या हत्येच्या धक्कादायक प्रकरणात न्यायालयाने आरोपी भिमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. या खटल्यात आरोपीवर चालवण्यात आलेल्या सर्व कलमांखालील गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले आहेत. यातील दोन गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची, एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने आरोपीला पिंजऱ्यात उभे करून स्वतःच्या कृत्याचा विचार करण्यास सांगितले आणि कोणती शिक्षा द्यायला हवी असे विचारले, त्यावर त्याने 'पाय घसरून पडल्याचा' आणि मुलीला केवळ मार लागल्याचा जुनाच बनाव पुन्हा रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्याला फटकारत तुझा गुन्हा सिद्ध झाला असून आता हा इतिहास झाल्याचे सांगितले.

फाशीचीच शिक्षा व्हावी

आरोपीला कोणती शिक्षा द्यावी यावर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. सरकारी वकिलांनी आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. आरोपीने अत्यंत घृणास्पद कृत्य करताना चिमुरडीवर तब्बल 39 मिनिटे अत्याचार केले आणि तिच्या अंगावर 18 गंभीर जखमा केल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. आरोपीला या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसून त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी इतिहास पाहता तो सुधारण्याच्या पलीकडे गेला आहे, त्यामुळे समाजात महिला व मुलींना सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी आणि सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकून राहण्यासाठी त्याला फाशी देणेच योग्य ठरेल, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

हे ही वाचा : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, सियाचा प्रियकर चेतन चौधरी नेमका कोण आहे?

जन्मठेप देण्याची मागणी

दुसऱ्या बाजूला, आरोपीच्या वकिलांनी घटनेच्या संगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बचावाचा प्रयत्न केला. आरोपीचे वय 65 वर्षे असून तो वृद्ध आहे, त्यामुळे तो इतके क्रूर कृत्य करू शकतो का, असा युक्तिवाद करत वकिलांनी त्याला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच आरोपी स्वतः या घटनेमुळे धक्क्यात असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, न्यायालयाने स्पष्ट केले की आरोपीला सात मुली आणि पत्नी असूनही समाजाने आणि त्याच्या कुटुंबाने त्याचे अस्तित्व नाकारले आहे, त्यामुळे कोणीही त्याची बाजू घेण्यासाठी पुढे आलेले नाही. तसेच त्याचा 'मानसिक आरोग्य' (मेंटल हेल्थ) आणि 'पोटन्सी रिपोर्ट' हा तो पूर्णपणे सक्षम असल्याचे सिद्ध करतो.

हे ही वाचा : चेतनच्या वडिलांचा सियाविषयी धक्कादायक दावा, काय म्हणाले?

29 जून रोजी निकाल

या संपूर्ण युक्तिवादानंतर न्यायालयाने या प्रकरणाची अंतिम शिक्षा सुनावण्यासाठी 29 जून ही तारीख निश्चित केली आहे. न्यायालयाने तारीख जाहीर केल्यानंतर कोर्टात उपस्थित असलेल्या पीडित मुलीच्या वडिलांनी न्यायाधीशांकडे हात जोडून आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्याची विनंती केली, जेणेकरून समाजात अशा विकृत प्रवृत्तींना जरब बसेल आणि असे भयंकर प्रकार पुन्हा घडणार नाहीत. या संवेदनशील प्रकरणाच्या निकालाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हे वाचलं का?