महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार; मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra weather report : महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे आणि कोकणासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra weather report : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाने ओढ दिली होती. पोषक वातावरण नसल्यामुळे केवळ ईशान्य भारतातच पाऊस सुरू होता. मात्र, आता बंगालच्या उपसागरात आणि मध्य प्रदेशच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली असून लवकरच राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अरबी समुद्रातील नैऋत्य वाऱ्यांच्या प्रभावामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुप्रीम कोर्टात घमासान, कपिल सिब्बलांचा युक्तीवाद
कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा?
पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांसाठी हवामान विभागाने विविध जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुण्यातील घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून तिथे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाची शक्यता असून स्थानिक नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे हवामान खात्याने सांगितले आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यांच्या तीव्रतेनुसार या इशाऱ्यांमध्ये पुढील काही तासांत बदल होण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस
जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता, राज्यातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर काही भागांत तीव्र टंचाईची स्थिती आहे. नाशिक, पुणे, पालघर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला, तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप लक्षणीय घट आहे. विशेषतः नंदुरबार, बीड आणि अमरावती या भागांत पावसाची मोठी तूट पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासावर एल निनो आणि हिंदी महासागरातील ‘पॉझिटिव्ह आयओडी’च्या स्थितीचा प्रभाव राहणार आहे. ही प्रणाली अनुकूल झाल्यास आगामी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात समाधानकारक पाऊस पडण्याची आशा हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
