
पुणेकरानों काळजी घ्या... असं आवाहन करण्याचं कारण म्हणजे पुणे शहरात धोकायदायक असलेल्या झिका व्हायरसने चंचुप्रवेश केलाय. पुण्यातील बावधन परिसरात एका 67 वर्षीय व्यक्तीला झिका व्हायरचा संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे महापालिका आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
पुणे शहरात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीये. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रुग्णाचे 67 वर्ष आहे. रुग्ण पुण्यातील बावधन परिसरातील आहे.
ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा जाणवत असल्याने सदरील रुग्ण 16 नोव्हेंबर जहांगीर रुग्णालयात आली होती. बाह्यरुग्ण विभागात व्यक्तीची तपासणी करण्यात आली. व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. 18 नोव्हेंबर रोजी समोर आलेल्या अहवालात या व्यक्तीला झिका विषाणू संबंधित असल्याचं स्पष्ट झालं.
त्यानंतर व्यक्तीचे नमुने पुण्यातील एनआयव्ही पुणे येथे तपासणी पाठवण्यात आले. 30 नोव्हेंबर रोजी मिळालेल्या अहवालानुसार सदरील रुग्णाला झिका व्हायरची लागण झालेली असल्याचं निश्चित झालं. झिका व्हायरसचा रुग्ण सापडल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पुणे महापालिकेकडून रुग्ण सापडलेल्या भागात रोग नियंत्रण योजना सुरू करण्यात आली.
रुग्णाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात एकही संशयित न सापडल्यानं महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला. हा रुग्ण मूळचा नाशिकचा असून, तो 6 नोव्हेंबर रोजी पुण्यात आलेला होता. ऑक्टोबर महिन्यात ही व्यक्ती सुरतला गेलेली होती. रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून, त्याला कोणतीही लक्षणं नाहीत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीये.
झिका विषाणू किंवा झिका व्हायरसचा संसर्ग मुख्यतः संक्रमित एडीस प्रजातीचा डास चावल्यानं होतो. एडिस डास प्रामुख्याने दिवसा चावतात. त्याची वेळ पहाटे आणि दुपार ते संध्याकाळ या वेळी असते.
खाज सुटणे, त्वचेवर पुरळ येणे, ताप, सर्दी, घाम येणे, सांधेदुखी, स्नायू वेदना आणि डोकेदुखी, थकवा, भूक कमी होणे आदी लक्षणं झिका व्हायरसाचा संसर्ग झाल्यानंतर जाणवू लागतात.
एखाद्या गर्भवती महिलेला संक्रमित डासाने चावा घेतल्यानंतर झिका व्हायरस प्लेसेंटामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे गर्भावर परिणाम होऊ शकतो. झिका व्हायरसचा संसर्ग कुणालाही होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यास गर्भवती महिलांना गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते, त्याचबरोबर गर्भाच्या मायक्रोसेफली आणि इतर न्यूरोलॉजिक विकृती यामुळे जन्मजात विकृतींचा परिणाम झिका विषाणूमुळे बाळामध्ये होतो. झिका आजारावर कुणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही.