रत्नागिरी : रेल्वे व्यापाऱ्याची 27 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

पोलिसांनी सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या, 100 टक्के रक्कम केली वसूल
रत्नागिरी : रेल्वे व्यापाऱ्याची 27 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

रेल्वे प्रवासादरम्यान सोने व्यापार्‍याची 27 लाख 86 हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लांबवणार्‍या 6 संशयितांना रत्नागिरी शहर पोलिसांनी अटक केली आहे. सांगलीतून या सहा जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षक मोहित कुमार गर्ग यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या कारवाईत शंभर टक्के रोख रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे. याचसोबत गुन्ह्यात वापरलेली 5 लाखांची गाडी असा एकूण 32 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रशांत भिमराव माने आणि विनोद रावसाहेब महिम हे दोघे व्यापारी 1 मे रोजी जामनगर तिरुवल्ली एक्सप्रेसने रत्नागिरी ते केरळ असा प्रवास करत होते. ते सोने तपासणी करण्याचे होलमार्क मशिन खरेदी करण्यासाठी आपल्या जवळील बॅगमध्ये 27 लाख 86 हजार रोख रक्कम घेउन जात होते. त्यांची ट्रेन कणकवली जवळ आली असता, आपल्याकडील बॅग गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आपली बॅग चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी रत्नागिरी शहर पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली होती.

या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधिकक्षक गर्ग यांनी विशेष पथकाची स्थापना करत तपासाला सुरुवात केली. रत्नागिरी पोलिसांचं एक पथक तपासाकरता केरळला पोहचलं आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.

मिळालेल्या माहितीच्या आधारावर, रत्नागिरी पोलिसांनी कारवाई करत सुरज हसबे, उमेश सुर्यगंध, अजय शिंदे, तुषार शिंदे, यश वेदपाठक आणि विकास चंदनशीवे या आरोपींना अटक केली आहे. सुरज हसबे हा विनोद महीम यांचा मावस भाऊ असल्याने ते मोठी रक्कम घेऊन केरळला जाणार असल्याची माहिती त्याला होती . त्यानंतरच त्याने मित्राना सोबत घेऊन चोरीचा कट रचला. अटकेतील एका आरोपीवर याआधीही एक गुन्हा दाखल असून तो एका टोळीचा सदस्य असल्याचं कळतंय. या कारवाईत सहभागी झालेल्या पोलीस पथकाला अधिक्षकांनी 25 हजारांचं इनमा जाहीर केलं आहे.

Related Stories

No stories found.